पुण्यात सावत्र बापाने चिमुरडीला भिंतीवर आपटून मारले, भारती विद्यापीठ पोलिसांकडून आरोपीला बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका सावत्र बापाने अवघ्या तीन वर्षीय चिमुरडीला भिंतीवर आपटून ठार मारल्याची धक्कादायक घटना आंबेगाव बुद्रूकमध्ये घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सावत्र बापाला बेड्या घातल्या आहेत. ही घटना 15 एप्रिलला रात्री बाराच्या सुमारास घडली असून वैद्यकीय तपासणीनंतर मुलीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.

मुस्कान पाटील (वय 3) असे खून केलेल्या चिमुरडीचे नाव आहे. जितेंद्र उत्तम पाटील (वय 33, रा. श्रीकृष्ण अपार्टमेंट, आंबेगाव बुद्रूक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि जितेंद्र यांचे चार महिन्यांपुर्वी लग्न झाले आहे. लग्नापूर्वी महिलेच्या नातलगांनी तिचा घटस्फोट झाला असून तीन वर्षांची मुलगी असल्याचे सांगितले. त्यानंतरही जितेंद्रने महिलेसोबत लग्न केले. मात्र, लग्नानंतर पत्नीचा घटस्फोट झाला नसून तिची मुलगी अनैतिक संबंधातून जन्माला आल्याचे जितेंद्रला समजले. त्याचा राग आल्यामुळे 15 एप्रिलला रात्री बाराच्या सुमारास त्याने मुलगी मुस्कानला मारहाण केली. तिचे पाय धरून भिंतीवर आपटले. तिला जखमी करून हातानेही मारहाण केली. त्यानंतर मुलगी खाली पडून जखमी झाल्याने बनाव करीत रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मारहाण केल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.

मुस्कानला उलटे धरून डोके भिंतीवर आपटले

अनैतिक संबंधातून मुलगी जन्माला आल्याचे कळताच जितेंद्रने तिला झोपेतून उठवून उलटे धरले. तिचे डोके भिंतीवर आपटून जखमी केले. हाताने मारहाण करीत पाय पकडून पुन्हा फरफटत नेले. अशारितीने चिमुरड्या मुस्कानचा आरोपीने खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

पत्नीच्या अनैतिक संबंधातून मुलगी जन्माला आल्याच्या संशयातून तीन वर्षीय मुलीला भिंतीवर आपटून खून करणाऱ्या सावत्र बापाला अटक करण्यात आली आहे.
– संगीता पाटील, पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे