दोन मुलींची ट्रकखाली चिरडून पित्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘व्हॉट्सऍपवर चॅटिंग करून मुलगी चुकीची वागली. त्यामुळे आम्ही आमचे जीवन संपवत आहोत. कोणालाही दोषी न धरता आमचा अंत्यविधी एकत्रच करावा’, अशी चिठ्ठी लिहून पित्याने पोटच्या दोन मुलींच्या अंगावरून ट्रक चालवून ट्रकखाली आत्महत्या केली. इंदोरी गावात रविवारी ही धक्कादायक घटना घडली.

नंदिनी भरत भराटे (18), वैष्णवी भरत भराटे (14), भरत ज्ञानदेव भराटे (40) अशी मृतांची नावे आहेत. मयत मुलींची आई सपना भरत भराटे (36) यांनी फिर्याद दिली आहे, अशी महिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिली.

भरत भराटे याच्याकडे एक ट्रक होता तसेच त्याची पत्नी सपना एका कंपनीत नोकरी करतात. मुलगी नंदिनी ही तिच्या मोबाईलच्या व्हॉट्सऍपवरून कोणत्यातरी मुलाला चॅटिंग करत होती. याचा राग अनावर झाल्याने भरतने नंदिनी व वैष्णवी या दोन्ही मुलींना शनिवारी दमदाटी केली. आई सायंकाळी घरी आल्यानंतर मुलींनी घडलेला प्रकार सांगितला.

सपना व त्यांच्या मुली शनिवारी रात्री जेवण करून झोपी गेल्या. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास दोन्ही मुलींना दमदाटी करून भरत याने रस्त्यावर झोपवले व ट्रक सुरू केला. ट्रकच्या आवाजामुळे जाग आल्याने सपना घराबाहेर आल्या. त्यावेळी दोन्ही मुली घरासमोरील रस्त्यावर झोपल्या असल्याचे त्यांना दिसले.

भरत याने मुलींच्या अंगावरून ट्रक चालवला. ट्रक चालू असताना ट्रकमधून उडी मारून स्वतः ट्रकच्या समोर झोपून भरत याने आत्महत्या केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी दिली. भरतने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. मुलगी चुकीची वागते. त्यामुळे आम्ही आमचे जीवन संपवत आहोत. त्यासाठी कोणालाही दोषी धरण्यात येऊ नये. आमचा अंत्यविधी एकत्र करण्यात यावा, असे चिठ्ठीमध्ये नमूद केले.