
गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधांची प्रकरणं आणि त्यातून होणारे गुन्हे वाढले आहेत. गेल्या वर्षी विवाहबाह्य संबंधातून पत्नीने पतीचा खून करून निळ्या ड्रममध्ये गाडल्याचे समोर आले होते. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. आताही उत्तर प्रदेशमधील कानपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कानपूरच्या महाराजपूर परिसरात राहणाऱ्या सचिन सिंह याने पत्नी श्वेता सिंह हिचा गळा आवळून खून केला आणि स्वत: पोलीस स्थानकात हजर झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सचिन मूळचू फतेहपूर येथील रहिवासी होता. चार महिन्यांपूर्वीच त्याचे श्वेताशी प्रेमविवाह झाला होता. मात्र त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. शुक्रवारी रात्री सचिनने श्वेता हिला दोन इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. त्यानंतर चौघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते.
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण शांत होईल असे वाटत होते, मात्र घरी परतल्यानंतर पत्नीने दोन्ही मुलांना सोडवण्यासाठी पतीवर दबाव टाकला. यामुळे रागाचा पारा चढलेल्या सचिनने श्वेता हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.
गुन्ह्याची कबुली देताना सचिनने नक्की काय घडले हे देखील पोलिसांना सांगितले. पत्नीवर संशय आल्याने तिला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता. गावी जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला आणि शुक्रवारी रात्री अचानक घरी परतला. घरी आल्यावर पत्नी दोन मुलांमध्ये बेडवर झोपल्याचे आपल्याला दिसल्याचे सचिनने सांगितले. पुरावा म्हणून याचा व्हिडीओ चित्रित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पत्नीने तरुणांकरवी मला मारहाण केली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना ताब्यात घेतले आणि पोलीस स्थानकात आणले. तडजोड करून प्रकरण मिटवू असे म्हणत सचिन आणि श्वेता तिथून निघाले. मात्र घरी आल्यावर तिने दोन्ही मुलांना सोडवून आणण्यासाठी दबाव टाकला. तसे न केल्यास त्या तरुणांसोबतच राहायला जाईल अशी धमकी दिली. याचा राग आल्याने सचिनने श्वेताला चांदरीत गुंडाळून तिची गळा दाबून हत्या केली. यानंतर शनिवारी सकाळी 10 वाजता पोलीस स्थानक गाठत गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

























































