
नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती त्याच्या पत्नीला मिळाली होती. या पत्नीने नवऱ्याला विवाहबाह्य संबंधांबद्दल जाब विचारला होता. याचा राग आल्याने या दोघांत कडाक्याचं भांडण झालं. या भांडणात नवऱ्याने बायकोचा गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना पुण्यातील भवानी पेठेत घडली आहे. 13 जून रोजी ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बायकोचा खून केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी सलीम शकील शेख (वय 33, रा. भवानी पेठ) याला अटक केली. सलीम याने त्याच्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या असलेल्या सुमैय्या शेखचा (वय 46) खून केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी या गुन्ह्याबाबत माहिती देताना सांगितले की सलीमचं सुमैय्याशी लग्न होण्यापूर्वी एक लग्न झालं होतं. सुमैय्यासोबतचं त्याचं दुसरं लग्न होतं. त्यानंतरही त्याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती सुमैय्याला मिळाली होती. ही महिला कोण आहे? तिच्यासोबत सलीमचे प्रेमसंबंध आहेत का ? अशी विचारणा सुमैय्याने सलीमकडे करायला सुरुवात केली होती. यावरून सलीम आणि सुमैय्या यांच्यात भांडण झालं होतं आणि भांडणादरम्यान सलीमने सुमैय्याचा खून केला. यानंतर सलीमने फ्लॅटला बाहेरून कुलूप लावलं आणि तो पळून गेला. पोलिसांना चौकशीदरम्यान मुख्य संशय हा सलीमवरच होता. त्याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी सांगितले.

























































