पैठणच्या मोक्षघाटावर पुडी खाऊन थुंकणाऱ्याला शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

पैठणच्या गोदाकाठावर असलेल्या दशक्रियाघाटावर पुडी खाऊन थुंकणे चांगलेच महागात पडले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी थुंकणाऱ्या तरुणास थुंकलेली जागा साफ करण्याची शिक्षा दिली आणि ‘स्वच्छ पैठण… पवित्र तीर्थक्षेत्र!’चा कृतिशील आदर्श घालून दिला. पैठण तीर्थक्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या पवित्र गंगा गोदावरीच्या मोक्षघाटावर दशक्रियाविधीसाठी मराठवाडा विभागातून मृतांचे आप्तस्वकीय येतात. याजागी भव्य असा मोक्षघाट उभारण्यात आलेला आहे. नगर परिषदेच्या ताब्यात असलेल्या या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने मोहीम राबविण्यात येत असते. नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी यासाठी स्वतंत्र स्वच्छता पथके कार्यान्वित केलेली आहेत.

पैठण नगर परिषदेकडे नुकताच शांतिब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर पाठीमागील नाथमोक्षघाट हस्तांतरित झाला असून, या ठिकाणी न.प.चे पथक स्वच्छता ठेवत आहे. गोदावरीत दशक्रियेसाठी येणारे भाविक भक्त निर्माल्य अथवा ज्याने प्रदूषण होईल अशा बाबीला मज्जाव करण्यात आला. तसेच त्या ठिकाणी स्वच्छता राहावी यासाठी जागोजागी स्वच्छता प्रमुख तैनात करण्यात आले आहेत. या पाश्र्वभूमीवर कार्तिकी एकादशीदरम्यान या घाटाच्या भागावर काही तरुण बसले असताना त्यातील एक तरुण पुडी खाऊन त्या ठिकाणी थुंकला. अस्वच्छता पसरवणारी ही बाब तेथील स्वच्छता प्रमुखांनी पाहिली असता त्यांनी तत्काळ मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांना कळविले. त्यानंतर थेट कारवाई म्हणून त्या तरुणाला गंगेतून पाणी आणून त्याने थुंकलेला भाग धुवून घेतला. तसेच ‘मोक्ष घाटावर कुठल्याही प्रकारचे प्रदूषण नाही करणार’ अशी शपथ त्या तरुणाला दिली. हा प्रकार म्हणजे या ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्या इतर नागरिकांना चपराक असून, अशी कारवाई त्यांच्यावर सुद्धा होऊ शकते असे आता स्पष्ट झाले आहे. आजच्या या प्रकारामुळे ‘स्वच्छ गोदावरी नमामी गोदावरी’ या मोहिमेला चालना मिळाली आहे.