लॅपटॉप ऑन करून झोपा काढायचा, तरीही 5 वर्षं नोकरीत मिळालं प्रमोशन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या कोरोनानंतर ऑफिसच्या कामाची पद्धत बदलली आहे. अनेकांना आता वर्क फ्रॉम होमची सोय झाली आहे. पण, अशी सोय नव्हती, त्या काळात एका पठ्ठ्याने नोकरीवर झोपा काढून पगार मिळवला आहे.

या माणसाने आपला अनुभव एका प्रसिद्ध ऑनलाईन शेअरिंग साईटवर शेअर केला. तो ऐकून कुणालाही अचंबा वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण, या माणसाने जवळपास पाच वर्षं आपल्या कामाच्या वेळी झोपा काढल्या. तरीही त्याला इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार आणि प्रमोशन मिळत गेलं.

या माणसाच्या म्हणण्यानुसार, 2015मध्ये त्याला एका कंपनीत डेटा इंट्री ऑपरेटरची नोकरी मिळाली. त्याला एका इमेलवरून काही माहिती पाठवली जायची. ती माहिती त्याला कंपनीच्या सिस्टिममध्ये टाकावी लागत असे. तेच त्याचं काम होतं. पण, तो कामाच्या नावाखाली रात्रभर झोपा काढत असे, पण त्याचं काहीही नुकसान झालं नाही.

वास्तविक, त्याने एक तांत्रिक कल्पना वापरून आपलं काम सोपं केलं होतं. तो एका कोडचा वापर करून त्याचं काम काही मिनिटात करून टाकत असे. एका आयटी तज्ज्ञांने तो कोड विकसित केला होता. त्या तज्ज्ञाला दुप्पट पैसे देऊन या माणसाने तो कोड तयार करून घेतला.

त्याला काम देणारी कंपनी वाहतूक खर्चाचे पैसे वाचवायच्या बेतात होती. त्यामुळे त्याला घरूनच काम करण्याची परवानगी मिळाली होती. त्याचा फायदा त्याने उचलला. कामाची वेळ झाली की तो त्याचा लॅपटॉप सुरू करायचा आणि त्या कोडचा वापर करून त्याचं रात्रभराचं काम काही मिनिटात करून टाकायचा.

त्यामुळे कामाचे उर्वरित तास त्याला मोकळे मिळायचे. तेव्हा तो चित्रपट बघणे, टाईमपास करणे किंवा चक्क झोपा काढणे असे उद्योग करत असे. विशेष म्हणजे त्याला त्या कामाबद्दल दरमहा पगार आणि वेळोवेळी बढतीही मिळाली. तसंच, कामावर कधीही सुट्टी न घेतल्याने त्याला कंपनीने विशेष पगारवाढही दिली. त्याचं काम पाहून त्याला अनेक कंपन्यांनी नोकरीची ऑफर दिली. पण, या कंपनीच्या कामाची पद्धत माहीत झाल्याने त्याने ही नोकरी सोडली नाही.