
छत्तीगढमधील एका तरुणाने समाधी घेण्यासाठी स्वत:ला जिवंतपणी खड्ड्यात गाडल्य़ाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चमन असे त्या तरुणाचे नाव असून त्याला पाच दिवसांनी तेथून मृतावस्थेत बाहेर काढण्यात आले.
महासमुंद जिल्ह्यातील पचरी गावात राहणारा चमन हा तरुण सतनाम या धार्मिक समाजाचा संदेश प्रवर्तक होता. चमन गेल्या काही वर्षांपासून स्वत:ला असे जमिनीखाली गाडून समाधी घ्यायचा. सुरुवातीला त्याने एक दिवस, दोन दिवस असे प्रयत्न करून बघितले. त्यात तो यशस्वी झाल्यानंतर त्याने दरवर्षी समाधी घेण्याच्या वेळेत वाढ केली. चमनने याआधी गेली चार वर्ष स्वत:ला कधी एक दिवस, दोन दिवस, चार दिवस जमिनीखाली गाडून घेतले होते. त्यानंतर त्याला त्याच्या अनुयानांनी बाहेर काढले व रुग्णालयात नेले असता तो बेशुद्ध असल्याचे समजले.
यावर्षी त्याने पाच दिवस जमिनीखाली राहण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार त्याच्या अनुयायांनी त्याच्यासाठी 16 डिसेंबरला चार फुटाचा एक खड्डा खणला होता. त्या खड्ड्यात त्याने स्वत:ला गाडून घेतले होते. मात्र 20 डिसेंबरला जेव्हा त्याला बाहेर काढण्यात आले. तेव्हा तो बेशुद्ध आहे असे त्याच्या अनुयायांना वाटले. म्हणून त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी चमनला मृत घोषीत केले.

























































