
ब्रिटनमधील केंब्रिजशायर येथे शनिवारी संध्याकाळी ट्रेनमध्ये अनेक प्रवाशांवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनमध्ये काही लोकांनी इतरांवर चाकूने वार केले. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि ट्रेन थांबवून दोन जणांना अटक केली.
केंब्रिजशायर कॉन्स्टेब्युलरीनं सांगितलं की त्यांच्या अधिकाऱ्यांनी ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिस (BTP) सोबत मिळून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ट्रेनला हंटिंग्डन येथे थांबवण्यात आले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी सांगितले, “संध्याकाळी 7:39 वाजता (स्थानिक वेळेनुसार) आम्हाला माहिती मिळाली की ट्रेनमध्ये अनेक लोकांवर चाकूने हल्ला झाला आहे. शस्त्रधारी अधिकारी लगेच घटनास्थळी पोहोचले आणि ट्रेनला हंटिंग्डन येथे थांबवण्यात आले, जिथे दोन पुरुषांना अटक करण्यात आली. अनेक जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे.”
ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांनी या भयानक घटनेचा निषेध करताना सांगितले की ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. त्यांनी म्हटले, “मी सर्व जखमी लोकांसोबत आहे आणि या हल्ल्यानंतर तातडीने कारवाई केल्याबद्दल आपत्कालीन सेवांचे आभार मानतो.” तसेच त्यांनी परिसरातील नागरिकांना पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.
























































