नातेवाईकाच्या छळाला कंटाळून व्यक्तीची आत्महत्या

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

साडूचा मुलगा बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून छळ करीत असल्याने एका व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास रांजणगाव परिसरात घडली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक चिठ्ठी जप्त करून तपासाला सुरुवात केली आहे.

रांजणगाव, सुशील विहारमधील चंद्रकांत फकिरा अंभोरे (४३) यांच्याविरुद्ध विजय साळवे याने सहा महिन्यांपूर्वी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. खोटा गुन्हा दाखल करून मानसिक छळ करीत असल्याने चंद्रकांत हे नेहमी तणावात राहत होते. चंद्रकांत यांनी सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक चिठ्ठी जप्त केली असून, त्यात विजय साळवेच्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. चंद्रकांत हा कंपनीत कामगार असून, त्याला दोन मुले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल पन्नुसिंग बहुरे यांनी आकस्मिक मृत्युची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.