प्रेयसी रिक्षाचालकासोबत पळून गेल्यामुळे तो चोरायचा फक्त रिक्षाचालकांचेच मोबाईल, चोरले तब्बल 80 मोबाईल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेयसी रिक्षाचालकासोबत पळून गेल्यामुळे एका तरुणाने बदला घेण्यासाठी चक्क रिक्षाचालकांनाच टार्गेट केले होते. रिक्षचालकांचा सूड घेण्यासाठी त्यांचे मोबाईल चोरायचा उद्योग तरुणाने सुरु केला होता. विविध भागातील रिक्षाचालकांचे तब्बल 80 महागडे फोन त्याने चोरले होते. अखेर लष्कर पोलिसांनी प्रेमभंग झालेल्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आसिफ उर्फ भूराभाई अरिफ शेख (वय – 37, रा. कॅम्प, मूळ, रा. अहमदाबाद) असे त्याचे नाव आहे.

मूळचा अहमदाबादचा रहिवासी असलेल्या आसिफला प्रेयसीसोबत लग्न करायचे होते. मात्र, त्याच्या लग्नाला कुटूंबियाचा विरोध होता. त्यामुळे त्याने अहमदाबादमधील रेस्टॉरंट विकले. त्यानंतर त्याने गेल्या वर्षी जून महिन्यात प्रेयसीसोबत लग्न केले आणि पुण्यात पळून आला.

प्रेयसीसोबत लग्न करुन नवीन व्यवसाय सुरू करण्याचा त्याचा विचार होता. पण दोनच दिवसांमध्ये त्याची प्रेयसी पैसे आणि इतर साहित्य घेऊन पुन्हा गुजरातला पळून गेली. त्यानंतर आसिफने गुजरातला जाऊन तिचा शोध घेतला असता, तिने एका रिक्षाचालकासोबत लग्न केल्याचे त्याला कळले. त्यानंतर आसिफने पुन्हा पुण्याला येऊन कोंढव्यातील नातेवाईकासह काम करण्यास सुरुवात केली. पण त्याच्या मनात रिक्षाचालकांबाबत कटुता निर्माण झाली होती. त्यामुळे रिक्षाचालकांना धडा शिकवण्यासाठी त्याने त्यांचे मोबाईल चोरायला सुरूवात केली. कात्रज, कोंढवा, कॅम्प अशा परिसरात रिक्षाने प्रवास करुन महागडे मोबाईल वापरणाऱ्या रिक्षाचालकांना हेरुन चोरीचा मार्ग अवलंबिला.

आरोपी
आरोपी

प्रवासानंतर रिक्षा थांबवल्यावर मोबाईल खराब असल्याचे तो चालकांना सांगत होता. त्यानंतर मित्राला फोन करण्याच्या बहाण्याने आसिफ रिक्षाचालकांकडून फोन घेत होता आणि फोनवर बोलण्याचा बहाणा करत रिक्षापासून काही अंतर चालत जाऊन पळून जात होता. अशारितीने त्याने तब्बल 80 मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून 20 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

‘प्रेयसीने रिक्षाचालकासोबत संसार थाटल्यानंतर त्यांचा बदला घेण्यासाने आरोपीने मोबाईल चोरीचा मार्ग अवलंबिला होता. त्यानंतर त्याने रिक्षाचालकांना हेरून तब्बल 80 महागडे मोबाईल चोरले होते. त्याच्याकडून 20 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत’, अशी माहिती लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी दिली.