‘त्याला’ व्हायचंय ‘ती’, पण ‘तो’ ठरतोय अडथळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) सध्या आपल्याच कर्मचाऱ्यामुळे ‘तो की ती’ या अजब-गजब प्रश्नात फसलं आहे. इथे काम करणाऱ्या एका एअर ट्रॅफिक कंट्रोल मॅनेजरला लिंग बदल करायचं असून तिने एएआयविरोधात लिंग भेदभाव केल्याची तक्रार केली आहे. आपण अशी एक महिला आहोत जी पुरुषाच्या रुपात अडकली आहे, असा या कर्मचाऱ्याचा दावा आहे. पण विमान प्राधिकरण हे मानण्यास तयार नाही, त्यामुळे त्या कर्मचाऱ्यानं कायद्याचा आधार घेत न्यायालयाचा दरवाजा खटखटवला आहे.

मुंबईच्या ३३ वर्षीय स्वरुप बंदीकलाने आपलं नाव बदलून मायरा ग्रेस बंदीकला असं केलं आहे. मात्र मायराने अनेकदा विनंती करून देखील विमान प्राधिकरण अधिकृत कागदपत्रांमध्ये तिचं नाव अद्याप बदललं नाही. तसंच नाहरकत प्रमाणपत्र ही दिलं नसल्याचा आरोप तिने केला आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये मायराला लिंग बदलाच्या सर्जरीसाठी बँकॉकला जायचे आहे. त्यासाठी मायरा या नव्या नावाने नवीन पासपोर्ट हवा आहे. मात्र अधिकृत कागदपत्रांमध्ये नावात बदल असल्याशिवाय आणि नाहरकत प्रमाणपत्राशिवाय पासपोर्ट मिळणे कठीण आहे.

मायराला पासपोर्टच मिळाला नाही तर सर्जरी करणे शक्य होणार नसल्याच म्हटलं आहे. तसेच तिचे अन्य साथीदार तिला धमकावतात. तसेच महिलांसाठीचे वॉशरुम वापरण्यापासून रोखतात, अशी तक्रारही केला आहे. तसेच विमान प्राधिकरणाला या संपूर्ण परिस्थिती कल्पना आहे. लिंग बदलासाठी तिच्यावर उपचार सुरू आहेत हे माहीत असूनही तिची बदली शिर्डी विमानतळावर करण्याचा प्रयत्न झाला. अखेर प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्यावर सुरू असलेल्या उपचारांची संपूर्ण माहिती दिल्यानंतर बदली रोखण्यात आल्याचं तिनं म्हटलं आहे.

सोमवारी न्यायमूर्ती नरेश पाटील आणि गिरीश कुलकर्णी यांनी बंदीकलाच्या याचिकेवर सुनावणी केली. त्यावेळी एएआयने आपली बाजू मांडताना स्वरुप बंदीकला या नावाने ते सध्या एक पुरुष कर्मचारी म्हणून संस्थेत कार्यरत आहेत. मात्र जोपर्यंत ते सर्जरी करून महिला होत नाहीत तो पर्यत त्यांचं नाव बदलण्यात येणार नसल्याचं म्हटलं आहे. मात्र त्याविरोधात बंदिकलाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालच्या या आधी देण्यात आलेल्या एका खटल्याचा आधार घेत बंदिकलाची मागणी योग्यच असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी २ जुलै ही तारीख दिली आहे.

कोण आहे बंदीकला?

बंदीकला आंध्रप्रदेशच्या तेनालीची रहिवासी आहे. पुरुष म्हणूनच ती जन्माला आली मात्र लहानपणापासून तिला शरीरामध्ये आपण स्त्री असल्याच भास होत होता. २०१० मध्ये ती कामानिमित्त मुंबईत आली आणि तिने एएआयमध्ये काम करायला सुरुवात केली. २०१६ मध्ये तिला जेंडर डिसफोरियाबाबत समजलं. त्यामुळेच आता लिंग परिवर्तन सर्जरीसाठी ती बँकॉकला जाणार आहे. मात्र नावातील बदलाच्या प्रश्नामुळे तिला पासपोर्ट मिळणे कठीण होऊन बसलं आहे.