
श्वास घ्यायला वरचेवर त्रास होत असल्याने इंग्लंडमधला एक तरुण डॉक्टरांकडे गेला होता. या तरुणाला तपासल्यानंतर डॉक्टरही चक्रावून गेले. 38 वर्षांच्या या तरुणाला गेली काही वर्ष श्वास घ्यायला त्रास होत होता. सुरुवातीला डॉक्टरांना वाटलं होतं की नाकातील पडदा एका बाजूला सरकल्याने त्या तरुणाला श्वासाला त्रास होत असावा मात्र आपल्या चेहऱ्यामध्ये कोणतेही व्यंग निर्माण झाले असून आपला चेहरा पूर्वीसारखाच असल्याचं सांगितल्यानंतर डॉक्टरांनी त्याची पुन्हा तपासणी केली होती.
डॉक्टरांनी या तरुणावर ऱ्हायनोस्कोपी केली तेव्हा त्यांना तरुणाच्या त्रासामागचं खरं कारण कळालं. डॉक्टरांना या तरुणाच्या नाकपुडीमध्ये पांढरी वस्तू दिसली होती. बारकाईने तपासल्यानंतर त्यांना कळालं की ती वस्तू म्हणजे दात होती, जी विचित्र जागी उगवली होती. नाकामध्ये दात उघवणं ही अत्यंत दुर्मिळ बाब असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. सागर खन्ना आणि मायकल टर्नर या दोघांनी या रुग्णाच्या विशेष केसबद्दल द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये विस्ताराने लिहिलं आहे. या तरुणाच्या नाकातला दात शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आला असून शस्त्रक्रियेनंतर तरुणाला कोणताही त्रास झालेला नाही. शस्त्रक्रियेनंतर तरुणाला नीटपणे श्वासही घेता येऊ लागला आहे.



























































