मनाली-लेह-खार्दुंगला सायकल मोहीम – सिशू ते जिस्पा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनाली–लेह–खार्दुंगला ही हिंदुस्थानातील अवघड सायकल मोहिमांपैकी एक आहे. सायकल मोहिमेच्या पहिल्या भागात आपण 15 माइल्स, मनाली (3900 फूट) ते मढी (11020 फूट) हून रोहतांग पास (13058 फूट) मार्गे सिशू हा रोमहर्षक प्रवास अनुभवला होता. आज सिशू आणि पुढच्या टप्पा गाठूया.

सिशू कॅम्प (10234 फूट) निसर्गाच्या कुशीत सुंदर ठिकाणी होता. ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. नदीवर सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसत होते. चिमणे पक्षी बागडत होते. सिशू कॅम्पला जाताना अटल टनेलची दुसरी बाजू आली. मनालीहून निघाल्यावर मढीला जाताना याच अटल टनेलची वाट न घेता रोहतांगची वाट चोखाळली होती आणि दुसऱया दिवशी रोहतांग पार केल्यावर अटल टनेलची दुसरी बाजू आली. या अटल टनेलमुळे किती प्रचंड अंतर वाचून प्रवास सुगम झालाय हे यावरून लक्षात आले. रोहतांगच्या रस्त्यावरच्या अवजड वाहनांचा वावरही या टनेलमुळे बराच कमी झाला आहे.

सिशूला जाताना रोहतांगाचा उतार संपल्यावर रोलिंग टेरेन सुरू होतो. ऊन पडले होते. त्यामुळे कपडय़ांचे एकावर एक चढवलेले थर उतरविणे आवश्यक झाले. हे केले तर थोडेच पुढे गेल्यावर पाऊस सुरू झाला. मग पुन्हा थांबून विंडचीटर घालणे क्रमप्राप्त होते. बंजी कॉर्डनी कॅरिअरला बांधलेली सॅक काढणे आणि परत बांधणे हा एक वेळखाऊ प्रकार असतो. त्यापेक्षा कॅरिअरला अडकवायच्या सायकल बॅग सुटसुटीत पडतात.

सिशूहून जिस्पाकडे जाणारा रस्ता सुरुवातीला सरळसोट आणि नंतर चढणारा होता. एका बाजूला नागमोडी वळणे घेत जाणारी बियास सोबत होती. राफ्टिंग पॉइंट, झिप लाइन इत्यादी वाटेत दिसत होते. पर्यटकांचा वावर जाणवत होता. अधूनमधून झाडी दिसत होती. काही ठिकाणी दरडी कोसळून रस्त्याची पार दैना उडाली होती. त्यात अवजड वाहने, जबलपूर फॅक्ट्रीचे सैन्याचे ट्रक यांचा सुळसुळाट होता. सगळी वाहने तीव्र चढामुळे काळा धूर ओकत जातात. याचा फार उपद्रव होतो.

हायवेवरून जवळजवळ दरीत उतरतोय की काय असे वाटावे इतका खोल केलाँग गावाचा रस्ता होता. केलाँगचा बाजार हा 3-4 दिवसांनी या वाटेवर लागलेला मोठा बाजार. काही छोटय़ा वस्तू वगैरे घेण्यासाठी मुद्दाम खाली उतरून आवर्जून आत शिरलो. हे चिमुकलं गाव वरून फारच आकर्षक दिसत होतं. दोन डोंगरांच्या कुशीत, नदीच्या सान्निध्यात पिटुकली दिसणारी टुमदार रंगीबेरंगी घरे आणि हिरवेगार मैदान बघून डोळय़ांना आल्हाद वाटला. इथे एका हॉटेलमध्ये स्थानिक पदार्थ चाऊमीन नूडल्स, मोमो वगैरेची चव घेतली, पण त्यासाठी दोन तासांची तपश्चर्या करावी लागली.

रणरणत्या उन्हात केलाँगचा चढ चढून सायकली पुन्हा महामार्गावर रस्ता कापू लागल्या. एका बाजूला डोंगर होते. झुळझुळ वाहणारा वारा होता, पण जरा थांबावं म्हटलं तर जिथे-तिथे निखळलेले दगड वगैरे दिसत. तशीच सायकल दामटत मध्येच विसावा घेत प्रवास सुरू होता. सोबती भेटत होते, ओळखी होत होत्या. आजचा चढ संपल्यामुळे मन आणि पाय जरा सैलावले होते. इतक्यात आमची एक सपोर्ट बाइक आली. रस्त्यात कोण कुठे आहेत याच्या चौकशा झाल्या आणि आता जर कोणी उशिरा पोहचत असतील तर गाडीतून घेऊन जावे लागेल अशी ताकीद मिळाली. समझनेवाले को इशारा काफी होता है… वाटेत दिसणाऱया सगळय़ांना इशारा देत इथून वाघ पाठी लागल्यासारखी जी धूम ठोकली ते थेट जिस्पा कॅम्पलाच चाके थांबली.

भागा नदीच्या तीरावरच्या माऊंटेनीअरिंग इन्स्टिटय़ूटच्या परिसरात जिस्पा कॅम्प होता. निळे आकाश, तपकिरी डोंगरांमधून डोकावणारा सूर्य, हिरवी झाडी, खळाळती नदी असे सुरेख, प्रसन्न दृश्य होते.

>> नमिता दामले