
हिमाचल प्रदेशातील निसर्गरम्य मनालीचे सौंदर्य पाहण्यासाठी गेलेल्या हजारो पर्यटकांवर सध्या भीषण संकट ओढवले आहे. मुसळधार बर्फवृष्टी आणि सलग सुट्ट्यांमुळे झालेल्या गर्दीने मनालीतील जनजीवन विस्कळीत झाले असून, शेकडो पर्यटक गेल्या २४ तासांहून अधिक काळ आपल्या वाहनांमध्ये अडकून पडले आहेत.
बर्फवृष्टी ठरली शाप
दीर्घ प्रतीक्षेनंतर हिमाचलमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे पर्यटन व्यवसायाला अच्छे दिन येतील, अशी आशा होती. मात्र, हीच बर्फवृष्टी पर्यटकांच्या जीवावर उठली आहे. रस्ते २ ते ३ फुटांच्या बर्फाखाली गाडले गेले असून मनालीकडे जाणारा १० किलोमीटरचा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे.
पर्यटकांचे भीषण हाल, वाहनांतच मुक्काम
हॉटेलमधील सर्व खोल्या आरक्षित (Full) असल्याने आणि रस्ते बंद असल्याने लहान मुलांसह आलेल्या पर्यटकांना कडाक्याच्या थंडीत रात्री गाडीतच काढाव्या लागल्या.
‘आम्ही २४ तासांपासून केवळ बिस्किटे आणि चिप्स खाऊन दिवस काढत आहोत. पिण्याचे पाणी आणि शौचालयाची कोणतीही व्यवस्था नसल्याने महिला आणि मुलांचे प्रचंड हाल होत आहेत’, अशी व्यथा पर्यटकांनी मांडली.
वाहने हलण्याची चिन्हे नसल्याने अनेक पर्यटकांनी १० ते २० किलोमीटर बर्फातून चालत जाण्याचा निर्णय घेतला.
प्रशासकीय यंत्रणा हतबल
हिमाचल प्रदेशातील सुमारे ८३५ रस्ते सध्या बर्फामुळे बंद आहेत. मनाली ते पतलीकुहल दरम्यान पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हवामान विभागाने आता पुन्हा एकदा ‘येलो’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला असून, सोमवारी आणि मंगळवारी कुल्लू, किन्नौर, चंबा आणि लाहौल-स्पिती जिल्ह्यात अधिक बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
प्रशासनाने पर्यटकांना सध्या डोंगराळ भागात प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून रस्ते मोकळे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
























































