
सात-बारा उताऱ्य़ावर नोंद करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्य़ा कसबा वाळवेच्या मंडल अधिकाऱ्य़ाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. विशांत विलास भोसले (वय 49) असे अटक केलेल्या मंडल अधिकाऱ्य़ाचे नाव आहे.
गेली अनेक वर्षे मंडल अधिकारी कसबा वाळवेचे कामकाज शेळेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या शेजारी असणाऱ्य़ा सांस्कृतिक हॉलमधून सुरू आहे. या कार्यालयामध्ये मंडल अधिकारी या पदावर विशांत भोसले हा कार्यरत आहे. तक्रारदाराचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून, तक्रारदाराच्या मित्राने खरेदी केलेल्या प्लॉटच्या सात-बारा उताऱ्य़ावर नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून तीन हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम दोन हजार करण्यात आली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. शेळेवाडी येथील कार्यालयात सापळा रचून लाच स्वीकारताना विशांत भोसले याला रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, सतीश मोरे, हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, पोलीस नाईक सुनील घोसाळकर, कॉन्स्टेबल अजय चव्हाण, रूपेश माने यांनी या कारवाईत सहभाग घेतला.





























































