ज्योती मांढरेची साक्ष अपूर्णच, वाई हत्याकांडाची सुनावणी 15 आणि 16 नोव्हेंबरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धोम (ता. वाई) येथील खून सत्राप्रकरणी दाखल असणाऱ्या संतोष पोळ याच्याविरोधातील खटल्याच्या कामकाजादरम्यान माफीचा साक्षीदार असणाऱ्या ज्योती मांढरे हिची साक्ष अपूर्णच राहिली आहे. आता या खटल्याची पुढील सुनावणी दि. 15 आणि 16 नोव्हेंबर या दिवशी होणार आहे.

वाई येथील मंगला जेधे यांच्या अपहरण आणि खूनप्रकरणी अटक केलेल्या धोम येथील संतोष पोळ याने नंतरच्या काळात पाच खुनांची कबुली दिली होती. या कबुलीनंतर पोलिसांनी पोळ याच्या धोम येथील घराच्या पाठीमागे, तसेच पोल्ट्री फार्म परिसरात खोदाई करत पाच मानवी सांगाडे जप्त केले होते.

या प्रकरणात ज्योती मांढरे हिने संतोष पोळ याला मदत केल्याचे तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी तिलाही अटक केली होती. न्यायालयीन कामकाजादरम्यान मांढरे हिला माफीचा साक्षीदार म्हणून घोषित करण्यात आले. दरम्यान, संतोष पोळ याच्याविरोधात दाखल असणाऱया आरोपपत्रावरील सुनावणी सातारा जिल्हा न्यायालयात झाली. यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित होते.

खटल्याच्या कामकाजादरम्यान बचावपक्षातर्फे ऍड. श्रीकांत हुटगीकर यांनी माफीचा साक्षीदार ज्योती मांढरे हिला काही प्रश्न विचारले. दुपारच्या सत्रापर्यंत मांढरे हिची साक्ष नोंदवून घेण्याचे काम झाल्यानंतर न्यायालयीन कामकाज थांबविण्यात आले. या खटल्याची पुढील सुनावणी नोव्हेंबर महिन्याच्या 15 आणि 16 तारखेला होणार आहे.