हापूसची निर्यात बंद, भाव गडगडले; सोमवारी आणखी 25 हजार पेट्या येणार

कोरोना रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे युरोपात ठप्प झालेली निर्यात, देशातल्या बाजारातील तुटलेली सप्लाय चेन आणि गेले सहा दिवस बंद असलेले एपीएमसी मार्केट यामुळे हापूसच्या किमती 50 टक्क्यांनी गडगडल्या आहेत. त्यातच सोमवारपासून एपीएमसी मार्केट सुरू होणार असून पहिल्याच दिवशी कोकण हापूसच्या 25 हजार पेट्या दाखल होणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये हापूसवर मनसोक्त ताव मारता येणार आहे.

कोकणचा राजा असलेल्या हापूसची सर्वाधिक निर्यात युरोपात होते. परंतु कोरोनाने त्याची पुरती नाकाबंदी केली आहे. कोरोनामुळे युरोपात हाहाकार उडाला असल्याने हापूसची निर्यात जवळपास ठप्पच आहे. त्यातच महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन असल्यामुळे पोलिसांकडून नाक्यानाक्यांवर ट्रक अडवले जात आहेत. परिणामी देशांतर्गत बाजारातील सप्लाय चेनवर परिणाम झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून एपीएमसी मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. हे मार्केट सोमवारपासून सुरू होणार असून कोकणातील बागायतदार पहिल्याच दिवशी 25 हजार पेट्या पाठवणार आहेत. सध्या निर्यात बंद असल्याने हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला असून चार ते पाच डझन पेट्यांची विक्री एक हजारापासून अडीच हजार या भावाने होण्याची शक्यता आहे, अशी माहिती फळबाजारातील व्यापारी विजय शेळके यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या