
नमिता वारणकर
वाचकांना प्रश्न पडला असेल… या दिवसांत आंबा…? सध्या जग खूप गतिमान झाले आहे. आवडीचे पदार्थ, फळं बाराही महिने मिळाली तर ते लोकांना हवंच असतं. राजस, शाही हापूस आंब्याचेही असेच आहे. अनेक प्रयोगांतून, कल्पकतेतून आंबा आता बाजारात उपलब्ध आहे. शेवटी आंबा हा आंबाच असतो. मग तो अगदी आफ्रिकेतील का असेना…
अवीट गोडीचा आणि कोकणचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला आंबा… आबालवृद्ध साऱयांनाच प्रिय असणाऱया या फळाची अपूर्वाई जगभरात प्रसिद्ध आहे… संस्कृतमध्ये ‘आम’, तमीळ भाषेत ‘मानके’ आणि इंग्रजीत ‘मँगो’ या नावांनी ओळखल्या जाणाऱया या फळाच्या हापूस, पायरी, तोतापुरी, केशर, रायवळ, दशहरी, बदामी, देवगड अशा अनेक प्रजाती आहेत… प्रत्येक जातींची निराळी चव आणि आगळे वैशिष्टय़ अंबाप्रेमींना मोहित करते… आमरस, आंबा पोळी, आंबा बर्फी, आंब्याचा शिरा, मुरांबा… अशा कितीतरी पदार्थांची चव जिभेवर रेंगाळत राहते. आंब्यावर नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात. या फळाचं वैशिष्टय़ हे की, एप्रिल ते जून हा या फळाचा मोसम असला तरीही शेतकऱयांच्या प्रयोगशीलतेमुळे तो ‘बारमाही’ मिळू लागला आहे. याचे उदाहरण म्हणजे नुकताच ‘आफ्रिकन हापूस’ बाजारात आलाय.
पूर्वी ठराविक मोसमात मिळणारा आंबा आता वर्षभर बाजारात मिळू लागलाय. याबाबत होणाऱया प्रयोगांविषयी सेंद्रिय कृषिभूषण पुरस्कारविजेते राजेंद्र भट सांगतात, मुख्यतः आंबा लवकर बाजारात येईल आणि वर्षभर कसा मिळेल असे प्रयत्न सध्या सुरू आहेत. यासाठी रासायनिक खतांचा वापर करून आंबा पिकवला जातो. आता आफ्रिकन आंबा बाजारात मिळत असला तरीही आंबा कधी खावा आणि तो अवेळी खाल्ल्यामुळे शरीरावर दुष्परिणाम काय होतील याचाही विचार व्हायला हवा. आंब्याला लवकर मोहर कसा आणता येईल आणि पैसे जास्त कसे मिळतील या दृष्टीने त्यावर प्रयोग होतात. यामध्ये झाडांवर वेगवेगळ्या रसायनांची फवारणी करणं, जमिनीमध्ये वाढ निरोधकं वापरणं, वाढ निरोधकांमुळे झाडांची वाढ थांबते आणि तयार झालेल्या ऊर्जेचं रुपांतर फुलांमध्ये होऊन फळ तयार होतं. या प्रक्रियेला ‘कल्टार’ म्हणतात. महाराष्ट्रात कल्टार वापरून कोणत्याही ऋतूत आंब्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. विशेष म्हणजे या प्रयोगांमध्ये झाडाची क्षमता असो वा नसो झाडाला फळं येतातच, पण यामुळे 5-10 वर्षात झाडाचं फळ देणं थांबतं. मात्र या प्रक्रियेमुळे वर्षभर आंबा मिळत असला तरीही पर्यावरण, झाड, जमिनीची आणि आंबा खाणाऱया माणसाची हानी होत आहे.
झाडावर फवारणी करण्याच्या प्रक्रियेत पोटॅशियम नायट्रेटचा वापर केला जातो. यामुळे झाडाला पोषण झाल्याची भावना होते. त्यामुळे झाडाला फुलं येतात. फुलांचं फळात रुपांतर होतं. याला ‘हार्मोनिकल बदल’ म्हणतात. अशा तऱहेने पिकवलेली फळं आपण खाल्ली तर शरीरातही हार्मोनिकल बदल होऊ शकतात. याकरिता हिंदु धर्मात ऋतुपालनाचं महत्त्व सांगितलं आहे. शक्यतो ठराविक ऋतुत मिळणारी फळे, पालेभाज्या शक्यतो खावीत, असे त्यांचे म्हणणे आहे.
आफ्रिकन हापूस…
जगभरात विषुववृत्तीय प्रदेशात सगळीकडेच आंबा पिकतो. हिंदुस्थानात पिकणाऱया आंब्याच्या जातींना ‘मॅगेरिना इंडिका’ असे म्हणतात. तसेच ज्या विकल्या जाऊ शकतात अशा 1400 जाती असून प्रत्येक प्रांताच्या जाती वेगवेगळ्या आहेत. आफ्रिकेमध्ये झाडाचा विस्तार लहान राहावा. यासाठी कलम केलं जातं. या प्रजाती ठरावीक ऋतुंमध्ये हवामानानुसार पिकतात. आफ्रिकेमध्ये बाऊल फिस्टिंग आणि सेंटर फिलर ओपन या पद्धतीने आंबा पिकवला जातो. उदा. मोठय़ा कपामध्ये आंब्याचं झाड वाढवलं तर मध्ये आंब्याचं झाड आणि आजूबाजूला पोकळपणा राहील अशा पद्धतीने ते लावलं तर या प्रकारात सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात मिऴतो. त्यामुळे आंब्याचं उत्पादन जास्त होतं,अशी माहिती आफ्रिकन हापूसविषयी राजेंद्र भट देतात.
- चांगला आंबा कसा ओळखाल?
- खाण्यापूर्वी अर्धा तास आंबा पाण्यात बुडवून ठेवावा. त्यामुळे त्याच्यातील अतिरिक्त उष्णता कमी होते.
- तांब्याभर पाण्यात चमचाभर मीठ घालून त्यामध्ये आंबा बुडवल्यास तो तळाशी गेला तर तो उत्तम चवीचा आंबा समजावा.
- रासायनिक खतांपासून तयार केलेला आंबा सहसा ओळखता येत नाही. तो फक्त शेतकऱयांकडून ओळखून घ्यावा लागतो. त्यासाठी तज्ञ शेतकऱयाकडून त्याची पारख करावी लागते.

























































