
सामना प्रतिनिधी । उरण
वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे उरण तालुक्यातील आंबा उत्पादनात घट झाली आहे. मोठ्या प्रमाणात नूकसान होत असल्याने आंबा बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
उरणमधीलकळंबुसरे, कोप्रोली, पाणदिवे, पिरकोन, पाले, गोवठणे, आवरे, सारडे, वशेणी, चिर्ले, नागाव, केगाव, म्हातवली, चाणजे, रानसई गावातील शेतकऱ्यांनी भातशेतीला जोडधंदा म्हणून आंब्याची झाडे लावली आहे. या आंबा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात दरवर्षी येत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते. मात्र, यावर्षी वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आंबा पिकांचे मोहर करपून गेले आहेत. तसेच काही आंब्यांच्या झाडांवर आलेल्या कैऱ्या वाढत्या थंडीमुळे गळून पडत आहेत. वातावरणातील बदलामुळे, वाढत्या थंडीमुळे यावर्षी आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. तरी संकटग्रस्त आंबा बागायतदारांना नूकसान भरपाई देण्यासाठी सरकारने कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी उरण तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकरी करीत आहेत. याबाबत उरण तालुका कृषी कार्यालयालयाचे अधिकारी के. एस.वसावे यांनी सांगितले की, उरणच्या आंबा पिकांच्या नुकसानीबाबत आदेश नसल्याने पंचनामे यावर्षी केले नाही.परंतू मागील वर्षी शेतकऱ्याना आंबा पिकांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.






























































