
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
उरणमध्ये काही दिवसांपूर्वी खारफुटीवर कचरा टाकणार्या दोन वाहनांवर कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच आज सोमवारी रोजी पुन्हा एकदा खारफुटीवर कचरा टाकून ती पेटवून देवून खारफुटी नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जीटीपीएस-करंजा रस्त्याच्या लगत खाडी किनार्यावर खारफुटीवर कचरा टाकून तो पेटविण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खारफुटी जळून नष्ट होणार आहे.
विकासाच्या नावाने उरण तालुक्यातील डोंगर, जंगले, समुद्र किनारे भकास करण्यात येत असताना थोडाफार पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्वाची भूमिका बजावणार्या कांदळवनाचे जंगल देखील आत्ता कोणत्या ना कोणत्या कारणासाठी नष्ट करण्याचा डाव आखण्यात येत आहे.
करंजा- जीटीपीएस रस्त्यालगत सिडको साडेबारा टक्के योजनेच्या प्लॉटच्या बाजूला असलेले कांदळवनाचे जंगलसुद्धा अशाच प्रकारे कचरा टाकून जाळण्याचा प्रयत्न सूरू आहे. मात्र या कांदळवनाची संरक्षणाची जबाबदारी असलेले वन विभाग आणि महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याने निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
खोपटा आणि करंजा खाडी किनार्यावर या खारफुटीचे जंगल मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र या खारफुटींवर येथील गावांचा कचरा आणून टाकला जातो आणि नंतर त्या कचर्याला आग लावली जाते. या आगीत अनेक खारफुटीची झाडे जळून खाक झाली आहेत. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना हे दिसत असून देखील ते या बाबत कारवाई करण्यास धजावत नाहीत.



























































