
मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड जिह्यातील कांदळवन राखीव वन म्हणून अधिसूचित करण्याबाबत तसेच या जमिनीवरील हरकती व दाव्यांची चौकशी तातडीने पूर्ण करून कांदळवनाची राखीव वन म्हणून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करा असे आदेश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिली.
आज पर्यावरण विभाग, वन विभाग आणि मॅनग्रोव्ह सेल सोबत झालेल्या आढावा बैठकीत राज्यातील मॅनग्रोव्ह संरक्षण तसेच प्रस्तावित मॅनग्रोव्ह पार्क प्रकल्पाबद्दल चर्चा झाली. pic.twitter.com/5WR5pxta8U
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 3, 2020
कांदळवन अधिसूचित करण्यासंदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आढावा बैठक घेतली. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व अन्य उपस्थित होते.
राखीव वन म्हणून अधिसूचित झालेल्या कांदळवनातील हरकती व दाव्यांची चौकशी 15 जानेवारी 2021 पर्यंत पूर्ण करावे तसेच महसूल विभागाच्या ताब्यात असलेले राखीव वन तातडीने वन विभागास हस्तांतरीत करण्याचे आदेश आदित्य ठाकरे यांनी दिले.
याव्यतिरिक्त मीरा-भाईंदर महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका व इतर महानगरपालिकांच्या ताब्यातील कांदळवन क्षेत्र राखीव वन म्हणून अधिसूचित करण्यास व वन विभागास हस्तांतरीत करण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्तांना दिले. तसेच अधिसूचित व हस्तांतरित कांदळवन क्षेत्राचे आकडय़ांचे ताळमेळ महसूल व वन विभागाने करून घेण्यासही सांगितले. वन विभागास हस्तांतरित केलेल्या कांदळवनाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याबाबतही निर्णय घेण्यात आले.
कोळीवाडय़ांच्या सीमांकनाबाबत सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे
कोस्टल झोन प्राधिकरण, मुंबई महापालिका, पर्यावरण विभाग व सर्व संबंधित विभागांनी कोळीवाडय़ांच्या सीमांकनाबाबत समन्वयाने काम करावे असे आदेश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिले.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित बैठकीत कोळीवाडय़ातील समस्या व त्यावरील उपाययोजनांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. अंतिम सीमांकन होईपर्यंत ग्रे क्षेत्रातील लोकांना हलवू नये अशी विनंती तेथील नागरिकांनी केली आहे. याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना मुंबई महापालिकेला देण्यात येतील, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.




























































