
हिंदुस्थानात असं एक मार्केट आहे, तिथं सगळंच खास आहे. मार्केटचे वैशिष्टय़ म्हणजे इथे एकही पुरुष दुकानदार नाही. तिथे फक्त आणि फक्त महिलाच दुकान थाटू शकतात. मणिपूरची राजधानी इंफाळ येथे हे अनोखे मार्केट आहे.
इंफाळमधील मदर मार्केट साधारण 500 वर्षे तरी जुने आहे. तेव्हापासूनच मार्केटवर महिलांचे राज्य आहे. मैती समाजाचे पुरुष लढाईसाठी महिनोंमहिने गावाबाहेर राहायचे. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पूर्णपणे महिलांवर असायची. महिला पैसे कमवायच्या आणि कुटुंबावर खर्च करायच्या.
आजच्या काळातही हजारो महिला कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. अनेक महिला तर या मार्केटमध्ये पिढीजात व्यवसाय करत आहेत. जास्त करून विवाहित महिला मार्केटमध्ये दुकान चालवताना दिसतात.
मणिपुरी भाषेत याला इमा कॅथिल मार्केट असे नाव आहे. तिथे भाजी, कपडे, मसाले, धान्य, खाण्याचे पदार्थ, पारंपरिक मणिपुरी वस्तू सारं काही एका छताखाली मिळतं. प्रत्येक महिला वर्षाला साधारण 75 हजार ते 3 लाखांपर्यंतची कमाई करते.



























































