
बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे मांजरा धरण मंगळवारी पूर्णपणे भरले. पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मांजराच्या उजव्या कालव्यातून 1.27 प्रति सेकंद घनमीटर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. मांजरा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने केज विधानसभा मतदारसंघात आनंद व्यक्त केला जात आहे.
बालाघाटाच्या डोंगररांगावरील प्रमुख जलवाहिनी असणाऱ्या मांजरा नदीवरील मांजरा प्रकल्प मंगळवारी शंभर टक्के भरला. महिनाभरापूर्वी प्रकल्पातील पाणी मृत साठ्यामध्ये होते. मात्र महिनाभरात झालेल्या जोरदार पावसामुळे मांजरा प्रकल्प पूर्ण भरला आहे. या प्रकल्पातून केज, धारूर, अंबाजोगाई, लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच काही तालुक्यांना शेतीसाठी पाणी पोहचविले जाते. लातूर शहरालाही औद्योगिक वसाहतीसाठी आणि पिण्यासाठी याच धरणातून पाणी उपलब्ध होते. मांजरा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने आनंद व्यक्त होत आहे. आज धरणातील पाणी पातळी समतोल राहावी यासाठी उजव्या कालव्यातून 1.27 प्रतिसेकंद घनमीटर पाण्याचा विसर्ग आमदार नमीता मुंदडा यांच्या हस्ते नदीपात्रामध्ये करण्यात आला.




























































