
मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांची हायकोर्टाच्या कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आज मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांनी संभाजीनगर येथील माणिकचंद पहाडे लॉ कॉलेजमध्ये कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांची 13 सप्टेंबर 1991 रोजी महाराष्ट्र आणि गोवा बार काwन्सिलमध्ये नोंदणी झाली. बार असोसिएशनच्या नोंदणीनंतर, संभाजीनगर येथील ज्येष्ठ वकील पै.प्रभाकरराव देशमुख यांच्या कार्यालयात त्या रुजू झाल्या. तेव्हापासून संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात त्यांनी वकिली केली. वकील म्हणून आपल्या कारकिर्दीत त्यांनी विविध दिवाणी, फौजदारी आणि घटनात्मक प्रकरणे, विशेषतः सेवाविषयक प्रकरणे हाताळली. त्यांनी जिल्हा परिषद हिंगोली, जिल्हा परिषद नांदेड, संभाजीनगर जिल्हा परिषद व महानगरपालिका, भारत संचार निगम लिमिटेड, एसबीआय लाईफ कॉर्पोरेशन, गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ यांसारख्या विविध सरकारी उपक्रम आणि निम-सरकारी संस्थांसाठी वकिली केली. ऑक्टोबर 2013 मध्ये त्यांची संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती तर ऑगस्ट 2025 मध्ये त्यांच्या कार्यकाळाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती.





























































