लोकांच्या सरकारवरील अविश्वासामुळेच देशात मंदी!डॉ. मनमोहन सिंग यांचा हल्लाबोल

462

देशातील लोकांचा सरकारवरील विश्वास कमी झाला आहे. सामाजिक सौदार्ह बिघडले असून अनेक उद्योजकांना भीतीने ग्रासले आहे. या अशा वातावरणामुळे देशाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे, अशा स्पष्ट शब्दांत विख्यात अर्थतज्ञ, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला. एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात डॉ. मनमोहन सिंग यांनी ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त करताना त्यामागची कारणमीमांसा केली आहे.

उद्योजकांना सरकारी यंत्रणांची भीती वाटते

देशातील अनेक बडय़ा उद्योजकांना भीतीने ग्रासले आहे. सरकारी यंत्रणांची भीती उद्योजकांना वाटते. भीतीमुळेच बँका उद्योगांना कर्ज देत नाहीत. अनेक उद्योजक नवे प्रकल्प सुरू करण्यास घाबरत आहेत, असे डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले.

जीडीपी 15 वर्षांतील निच्चांकी पातळीवर

देशाचा विकासदर (जीडीपी) 15 वर्षांतील निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. बेरोजगारीचा दर गेल्या 45 वर्षांतील उच्चांकी पातळीवर गेला आहे. बँकांचा ‘एनपीए’ आतापर्यंतचा सर्वाधिक झाला आहे. महागाई वाढत आहे. अर्थव्यवस्थेची अवस्था खूपच गंभीर आहे. मी विरोधी पक्षनेता म्हणून हे सांगत नाही तर देशातील सध्याची अर्थव्यवस्थेची स्थिती मांडत आहे, असे डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

जनता आणि सरकारी योजनांमध्ये सामाजिक सौदार्ह कसे आहे यावर अर्थव्यवस्था अवलंबून असते; पण आज देशातील जनतेचा सरकारवरील विश्वास कमी झाल्याचे चित्र आहे. देशातील आर्थिक मंदीच्या वातावरणामागे हे प्रमुख कारण आहे.

देशात आज प्रत्येकजण घाबरलेला आहे. सरकारी यंत्रणा आणि सरकारी संस्थांचे अधिकारी खरे बोलायला घाबरत आहेत. वास्तविक सरकारी यंत्रणा आणि अधिकारी हे देशाच्या अर्थव्यवस्थेची चाकं आहेत. पण तेच घाबरल्यामुळे विकासाचा वेग मंदावला आहे.

देशात स्वायत्ता संस्था हा महत्वाचा घटक आहे. पण लोकांचा या संस्थांच्या स्वायत्ततेवरील विश्वास कमी होत आहे. जनता आणि या संस्थांचे संबंध मजबूत असतील तर अर्थव्यवस्थाही मजबूत होते.

आयटी क्षेत्रातील 40 हजार नोकऱ्या जाणार

आर्थिक मंदीमुळे रोजगारावर परिणाम झाला असून त्याचा सर्वाधिक फटका माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला बसणार आहे. यंदा आयटी क्षेत्रातील सुमारे 40 हजार कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील अशी शक्यता इन्फोसिसचे माजी सीईओ मोहनदास पै यांनी व्यक्त केली आहे. दर पाच वर्षांनी आयटी क्षेत्रात बदल होत असतात. त्या बदलानुसार कर्मचाऱ्यांनी योगदान दिले नाही तर त्यांना नोकरी गमवावी लागते. एखाद्या कंपनीची भरभराट होते तेव्हा कामगारांना पगारवाढ आणि पदोन्नतीही दिली जाते. त्यावेळी त्याचा आर्थिक बोझा कंपनीला जाणवत नाही. परंतु कंपनीचा विकास मंदावतो आणि नव्या बदलाप्रमाणे कर्मचारी योगदान देण्यात तोकडे पडतात तेव्हा सर्वाधिक पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून नोकरकपात करावी लागते असे पै यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या