नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशात मंदी आली, मनमोहन सिंग यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-manmohan-singh

नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयांमुळे देश मंदीच्या खड्ड्यात गेला आहे, अशी टीका हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे. हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेत प्रगती करण्याची प्रचंड क्षमता आहे, मात्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेत मंदी आल्याचं टीकास्त्र सिंग यांनी सोडलं आहे.

सिंग पुढे म्हणाले की, गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेली कमालीची उदासिनता ही या मंदीचं मुख्य कारण आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रांमध्ये साडे तीन लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे. असंघटित क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीची घसरण झाल्याने अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. गेल्या तीन महिन्यात हिंदुस्थानचा जीडीपी दर 5 टक्के इतका झाला आहे. हा आकडा मंदीचं द्योतक आहे. उत्पादन क्षेत्रात फक्त 0.6 टक्के इतकीच प्रगती होताना दिसत आहे. महसुलातही घट झाली असून विक्री दरांमध्येही गेल्या सव्वा वर्षात आजवरची सर्वाधिक घट पाहायला मिळत आहे, असं सिंग म्हणाले.

अनेक संस्थांच्यी स्वायत्तता धोक्यात आल्याची टीका करत सिंग म्हणाले की, सरकारने आरबीआयकडून 1.76 लाख कोटी रुपये घेतले आहेत. मात्र या पैशांचा विनियोग नेमका कोणत्या योजनांसाठी केला जाणार आहे, याची कोणतीही उत्तरे सरकारकडे नाहीत. त्यामुळे सरकारची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची पूर्तता न झाल्याने आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. भू-राजकीय पातळीवर आलेल्या बदलांमुळे जागतिक व्यापारात उपलब्ध झालेल्या संधींचा फायदा हिंदुस्थानला घेता आला नाही. त्यामुळे निर्यातीचा दर घटला आहे. मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेची ही स्थिती बनली आहे, अशी टीका सिंग यांनी केली आहे.