ना मंडप, ना सावली, ना पाणी, ना अन्न! भरउन्हात मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू; माघारीसाठी मंत्री विखे-पाटील यांची रात्री उशिरापर्यंत मनधरणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ना मंडप, ना सावली, ना पाणी, ना अन्न… डोक्यावर आग ओकणारा सूर्य, पायाखाली तव्यासारखी तापलेली जमीन, पारा चाळिशीच्या पुढे गेलेला.. रखरखत्या उन्हात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे शनिवारपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले. उपोषणाला बसण्यापूर्वी सरकारच्या वतीने मराठा आरक्षण उपसमितीचे राधाकृष्ण विखे-पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दीड तास जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही उपयोग झाला नाही. सरकारने दिलेला 14 आश्वासनांचा प्रस्ताव सध्या अभ्यासकांच्या कोर्टात आहे. दरम्यान रात्री उशिरा पुन्हा विखे-पाटील यांनी जरांगे यांच्याशी चर्चा करून मनधरणीचे प्रयत्न केले.

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्यांबद्दल सरकार सकारात्मक आहे. आम्ही रात्री मुख्यमंत्री, उच्चपदस्थ अधिकाऱयांशी चर्चा करून 14 मागण्यांबद्दलचा प्रस्ताव आणला आहे. एक दोन मागण्या सोडल्या तर बाकी सर्व मागण्यांवर आमचे एकमत आहे. कायद्याच्या चौकटीत राहून जे जे काही करणे शक्य आहे ते ते सर्व आम्ही करत आहोत, मनोज जरांगे यांनी उपोषण न सोडता फक्त सावलीत बसावे, अशी आमची विनंती असल्याचे विखे-पाटील म्हणाले.

मनोज जरांगे यांच्या मागण्या

– 58 लाख कुणबी नोंदींची माहिती देण्यात यावी.
– हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी दाखले देण्यात यावेत.
– जात पडताळणी प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावेत.
– सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्यात यावी.
– मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय.
– आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांना अर्थसाहय़.
– मोडी भाषेचे तज्ञ तत्काळ नेमावेत.
– ईडब्ल्यूएसमधून निवड झालेल्यांचा निर्णय.
– न्या. शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी.
– सारथी संस्थेबाबत तत्काळ निर्णय घ्या.
– अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी द्या.

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. आमची भूमिका पारदर्शक आहे. आम्ही समाजांना एकमेकांसमोर आणून भांडायला लावत नाही. घटना आणि न्यायालयाच्या चौकटीत राहून निर्णय घेतो. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री