
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार उदासीन आहे. कुणबी नोंदीवरूनही घोळ घातला जात असून 48 लाख नोंदी सापडल्याचा सरकारचा दावा खोटा असल्याचा हल्ला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. मराठा आरक्षण उपसमितीला दिलेल्या अहवालात 58 लाख नोंदींचा उल्लेख आहे. अधिकारी वर्ग नोंदींच्या बाबतीत सरकारला चुकीची माहिती देत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिंदे समितीला दिलेल्या मुदतवाढीनंतर नवीन 48 लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा केला होता. त्यावरून प्रमाणपत्र वाटपही करण्यात आल्याचे विखे यांनी सांगितले होते. मात्र हा दावा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना खोडून काढला.


























































