धनंजय मुंडे यांना जवळ कराल तर याद राखा! मनोज जरांगे यांचा अजित पवारांना थेट इशारा

महादेव मुंडे, संतोष देशमुख यांच्यासह बीड जिल्हयात झालेल्या प्रत्येक खुनाचा तपास लागलाच पाहिजे, तोपर्यंत धनंजय मुंडे यांना जवळ कराल तर याद राखा ! असा स्पष्ट इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मुंडे यांना राजकीय आश्रय देण्याचा प्रयत्नही झाला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तुमचे सगळे उमेदवार पाडले जातील, असेही जरांगे म्हणाले.

परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या अमानुष हत्येला दोन वर्षे उलटून गेले. आजही मुंडे कुटुंब न्यायासाठी वणवण करीत आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी दोन वेळा आत्महत्येचाही प्रयत्न केला. परंतु वाल्मीक कराडची चाकरी करणाऱ्या पोलीस प्रशासनाला पाझर फुटला नाही. मुंडे कुटुंबाला पाठबळ देण्यासाठी तसेच लढा उभारण्याचे नियोजन करण्यासाठी शुक्रवारी बीड येथे बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या बैठकीला मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, बाळा बांगरसह मोठ्या प्रमाणावर बीडकरांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात नो एन्ट्री !

मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना आठ दिवसांत महादेव मुंडे यांचे मारेकरी पकडा, लोकांना कायदा हातात घेण्यास भाग पाडू नका, असा इशारा दिला. परळीतील लाभार्थ्यांच्या टोळ्या संपवण्यासाठी पुढे या, असे आवाहनही त्यांनी केले. मंत्रिपद गेल्यापासून काहीजण अस्वस्थ आहेत. कशासाठी पाहिजे मंत्रिपद? लोकांना मारण्यासाठी, टोळ्या पोसण्यासाठी? खंडण्या वसूल करण्यासाठी? आता हे चालणार नाही. अजित पवार यांनीही अशा माणसांना दूरच ठेवावे, नसता आगामी निवडणुकीत तुमचे उमेदवार ठरवून पाडले जातील, असे जरांगे म्हणाले.