
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे आधी करा आणि त्यानंतर कुणबी प्रमाणपत्र वितरीत करा. कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय नोकरभरती करू नका. पोलीस भरतीची प्रक्रियाही सुरू करू नका असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज सरकारला दिला.
कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी सरकारने अजून पंधरा दिवसांचा कालावधी घ्यावा. मराठवाडय़ातील सर्व मराठय़ांना कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण झाल्याशिवाय कोणतीही सरकारी भरती करण्यात येऊ नये. दिवाळी झाल्यानंतर 15 दिवसांनी प्रमाणपत्र वितरित झाली तरी चालतील अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली आहे.
आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारणार
मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे यांना आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. दिवाळी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजव्यापी बैठक घेण्यात येणार असून त्यात आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, असे जरांगे म्हणाले. शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर सरकारच्या मुंडक्यावर पाय द्यावा लागेल. केवळ शेतात फिरल्याने आणि भाषणबाजी केल्याने उद्ध्वस्त झालेला शेतकरी पुन्हा उभा राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.