
संपूर्ण देशभर चर्चेत असलेल्या मनसुख हिरेन हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. हिरेन याला तो फोन ‘तावडे’ याने नव्हे, तर ‘शिंदे’ याने केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. एटीएसने धडाकेबाज कामगिरी करीत आज बुकी नरेश गोर (31) व लखनभैया चकमकीत सहभागी असलेला निलंबित पोलीस विनायक शिंदे (51) यांना अटक केली.
दोघांनाही 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आणखी एकाच्या लवकरच मुसक्या आवळण्यात येणार असून त्याचा शोध सुरू आहे. एटीएसने अत्यंत कमी वेळेत या हत्येची पाळेमुळे शोधून काढली आहेत. या प्रकरणाला आणखी कोणते वळण लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एटीएसने आज मनसुख हिरेन हत्याप्रकरणी दोघांना अटक केल्याचे समजताच संपूर्ण दिवसभर मीडियाचा फोकस याच घटनेवर होता. मनसुख हिरेन याचा मृतदेह 5 मार्च रोजी मुंब्य्राच्या खाडीत सापडला होता. आदल्या दिवशी म्हणजे 4 मार्च रोजी हिरेन यांना तावडे नावाच्या एका अधिकाऱयाचा फोन आला आणि रात्री आठच्या सुमारास ते घरातून बाहेर पडले. त्यानंतर ते पुन्हा घरी परतलेच नाहीत. मात्र तो फोन तावडेने नव्हे, तर निलंबित पोलीस शिंदे याने स्वतः तावडेच्या नावाने केला होता. त्यामुळे शिंदे याचा या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर विविध प्रश्नांचा भडीमार करून हिरेन यांना नेमके कसे, कुठे आणि कधी मारले याची माहिती एटीएसचे अधिकारी काढून घेणार आहेत.
मोठी टीम ठाण्यात दाखल
एटीएसचे प्रमुख जय जीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली डीआयजी शिवदीप लांडे, उपायुक्त राजकुमार शिंदे, एसीपी श्रीपाद काळे, पोलीस निरीक्षक दया नायक, अनिल ढोले यांची विशेष टीम आज सकाळी ठाण्यात धडकली आणि ही अटकेची कारवाई केली. या हत्या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’ने स्वतःच्या ताब्यात घेतला असला तरी त्यापूर्वीच महाराष्ट्रातील एटीएसने हिरेन हत्येचा छडा लावला आहे.
कोर्टात बेडय़ा ठोकून आणले
आज दुपारी अटक केलेले बुकी नरेश गोर व निलंबित पोलीस विनायक शिंदे या दोघांनाही सुट्टीच्या कोर्टात बेडय़ा ठोकून आणले. यावेळी न्यायालयाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. न्यायमूर्तींनी एटीएसच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर गोर व शिंदे या दोघांनाही 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सीमकार्ड पुरवले
एटीएसने आज अटक केलेला बुकी नरेश गोर याने सचिन वाझे व विनायक शिंदे यांना बेकायदेशीरपणे पाच ते सहा सीमकार्ड पुरवली असल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. तीन मोबाईलही सापडले असून व्होडाफोनचे गुजरातशी कनेक्शन असलेले 8 सीमकार्डदेखील मिळाली आहेत. या सीमकार्डमुळे आणखी गुपित माहिती एटीएसच्या हाती येण्याची शक्यता आहे.
वाझे यांची भेट घेतली होती
एटीएसच्या पथकाने आज अटक केलेला निलंबित पोलीस विनायक शिंदे याने मुंबई पोलीस मुख्यालयात जाऊन सचिन वाझे याची भेट घेतल्याचेही समोर आले आहे. एवढेच नव्हे तर त्याने वाझे यांच्या अनेक कारनाम्यांमध्ये प्रत्यक्ष भाग घेतला होता, असा संशय एटीएसने व्यक्त केला आहे. लखनभैया चकमकीत शिंदे याला दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. मात्र तो पेरॉलवर सुटला होता. तसेच तो सचिन वाझे यांच्या संपर्कात होता, असा दावा करण्यात आला आहे.
घडय़ाळ, पाकीट आणि डेबीट कार्डचा शोध घेणार
मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी प्रत्यक्ष गुह्यात वापरलेले मोबाईल कोणते, याचा शोध घेण्यात येणार आहे. तसेच स्फोटकांचा गुन्हा आणि हिरेनची हत्या याचा परस्परसंबंध काय, याचाही छडा एटीएस लावणार आहे. हिरेन यांच्या अंगावरील सोन्याची चेन, घडय़ाळ, पाकीट डेबिट तसेच क्रेडिट कार्ड आदी वस्तू अद्याप मिळालेल्या नाहीत. त्याचा शोध एटीएस घेणार आहे. तसेच हत्येचा कट नेमका कुठे रचला, त्यात कोण सामील होते याचाही तपास केला जात आहे.
सर्वात जटील केसचा गुंता सुटला!
माझ्या कारकीर्दीतील सर्वात जटील केसचा गुंता सुटला आहे, अशी फेसबुक पोस्ट एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी केली आहे. ते म्हणतात, अति संवेदनशील असा मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. हे हत्या प्रकरण उलगडण्यासाठी गेले कित्येक दिवस एटीएसमधील माझ्या सहकाऱयांनी अपार कष्ट घेतले. दिवसरात्र एक केला. त्या सर्व सहकाऱयांना मी मनापासून सॅल्यूट करतो! हे प्रकरण माझ्या कारकीर्दीतील सर्वात जटील प्रकरण होते.





























































