मंत्रालयाच्या प्रशासकीय इमारतीत घाणीचे साम्राज्य, स्वच्छता अभियानाचे तीन तेरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

राज्याचा प्रशासकीय कारभार चालवल्या जाणाऱ्या मंत्रालयाच्या प्रशासकीय इमारतीत सध्या मांजरांनी उच्छाद मांडला आहे. मेलेल्या मांजरीचा व विष्ठेचा एकीकडे उग्र दर्प तर दुसरीकडे कचरा डेपो व इमारतीच्या आवारातील घाणीच्या साम्राज्यामुळे प्रशासकीय इमारतीतील सरकारी कर्मचारी बेजार झाले आहेत. ‘स्वच्छ भारत’ योजनेचा सरकारी इमारतीतच बोजवारा उडाला आहे. इमारतीच्या आवारात किमान 30 ते 40 मांजरींचा मुक्त वावर आहे. कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या दुपारच्या जेवणातील उरलल्या अन्नावर या मांजरी पोसल्या आहेत.

डेटा विभागाला धोका
या इमारतीत लोकायुक्त, निवडणूक आयुक्त, माहिती आयुक्तांचे तसेच उद्योग संचालनालय, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण विभाग, वित्त व लेखा विभाग आणि सर्वात महत्त्वाचा डेटा विभाग आहे. मंत्रालयातील सर्व गोपनीय माहिती या डेटा विभागातील संगणकावर जपून ठेवली आहे, पण तरीही आगीच्या या धोक्याकडे दुर्लक्ष केल्याचे कर्मचारी सांगतात.

इमारतीला आगीचा धोका
या इमारतीच्या तळमजल्यावरील रद्दी डेपोला आग लागली तर मोठी दुर्घटना घडू शकते. बाजुलाच असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे कार्यालयालाही धोका आहे. असे पत्र या संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दोनदा दिले आहे, पण तरीही हा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने घेतलेला नाही.