मंत्रालयाचे पुन्हा झाले सचिवालय

988
mantralaya-5

महाराष्ट्रात 44 वर्षांपूर्वी सचिवालयाचे नामकरण मंत्रालय झाले, पण जवळजवळ एक महिना मंत्रालयात मंत्र्यांचेच अस्तित्व नसल्याने सर्व राज्य कारभार सचिवांच्या हातात गेला आहे. परिणामी मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ओहोटी लागलेली मंत्र्यांची दालने तर फाइल आणि अर्ज घेऊन सचिवांच्या दालनांसमोरील गर्दीमुळे सचिवांच्या हातात सत्तेची सूत्रे गेल्याचे दिसून येते.

राज्याचा कारभार चालवले जाणारे मुख्यालय पूर्वी सचिवालय म्हणून ओळखले जात होते. सचिव राज्याचा कारभार चालवतात म्हणून सचिवालय म्हणून परिचित होते. पण 1975 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या काळात सचिवालयाचे नामकरण मंत्रालय झाले. कारण मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री या इमारतीत बसतात आणि मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित सचिव काम करतात म्हणून मंत्रालय झाले. तेव्हापासून सचिवालयाऐवजी मंत्रालय म्हणून ओळख निर्माण झाली. पण जवळजवळ एक महिन्यापासून मंत्रालयाच्या इमारतीमध्ये मंत्रीच नसल्यामुळे सचिवांच्या हातात कारभार गेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या दालनात निर्णयाची सर्व सूत्रे होती, पण आता पाचव्या मजल्यावरील मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या दालनात सर्व सूत्रे गेली असल्यामुळे पुन्हा सचिवालय निर्माण झाल्याचे चित्र आहे.

मंत्र्यांच्या पाट्या गेल्या

सध्या मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावरील मंत्र्यांच्या दालनाबाहेरील पाट्या काढण्यात आल्या आहेत. सर्व दालने बंद आहेत. मंत्र्यांच्या दालनाबाहेरील वर्दळ ओसरली आहे. त्याच वेळेस सचिवांच्या दालनाबाहेरील गर्दी वाढली आहे. दर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली जात होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मंत्रालयात दररोज सरासरी सात ते साडेसात हजार व्हिजिटर्स येत, पण आज मंगळवार असला तरी अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखे व्हिजिटर्स मंत्रालयात दिसत होते.

मंत्रालयाच्या आवारात सध्या मंत्र्यांच्या गाड्या धूळ खात उभ्या आहेत. राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात असताना मंत्र्यांच्या गाड्यांची सतत वर्दळ सुरू असायची, पण मंत्रीच नसल्याने मोटारींना ब्रेक लागला आहे. अनेक मोटारींवर धूळ चढली आहे. मात्र सनदी अधिकार्‍यांच्या मोटारी मात्र दिमाखात फिरताना दिसत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या