थांब तुला दाखवतोच! मनवा नाईकने सांगितला ‘उबर’ चालकाचा भयंकर अनुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातल्या प्रमुख सामाजिक प्रश्नांपैकी एक म्हणजे महिला सुरक्षा. सार्वजनिक ठिकाणी किंवा वाहतुकी दरम्यान अनेक महिलांनी अप्रिय आणि भयंकर घटनांना सामोरं जावं लागतं. असाच एक भयंकर प्रसंग अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका मनवा नाईक हिने अनुभवला आहे. उबेर या अॅप्लिकेशन बेस टॅक्सी सेवेच्या चालकाकडून हा भयंकर अनुभव आल्याचं तिने सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

मनवा यांनी शनिवारी प्रवासासाठी उबेर बुक केली होती. बीकेसी परिसरात आल्यानंतर उबेर चालकाने फोनवर बोलायला सुरुवात केली. तिने त्याला तसं न करण्यास सांगितलं, पण त्याने ऐकलं नाही. त्यानंतर त्याने सिग्नलही तोडला. त्यावर मनवा यांनी त्याला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने ऐकलं नाही. थोड्यावेळाने ट्रॅफिक पोलिसांनी त्याला अडवलं. त्याच्या गाडीचा फोटो काढला. त्यावर तो पोलिसाशी वाद घालू लागला. मनवा यांना इच्छित स्थळी पोहोचण्यास उशिर होत असल्याने त्यांनी मध्ये पडून पोलिसांना त्याला जाऊ देण्याची विनंती केली. त्यावर सदर चालकाने त्यांच्याशी उद्धट वर्तन केलं. तरीही प्रवास सुरू ठेवण्याचा निर्णय मनवा यांनी घेतला. प्रवास सुरू होताच त्या चालकाने मनवा यांना धमकावयला सुरुवात केली. मनवा यांनी त्याला गाडी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यास सांगितलं. पण, त्याने वाद घालायला सुरुवात केली. दरम्यान त्याने दोन वेळा गाडी उभी करण्याचा प्रयत्न केला आणि तो मनवा यांना धमकवू लागला. मनवा यांनी उबेर सेफ्टीला कॉल केला पण उबेरचा प्रतिनिधी अन्य कॉलवर व्यग्र होता. याच वेळी चालकाना गाडी भरधाव वेगात चुनाभट्टीच्या दिशेने न्यायला सुरुवात केली आणि कुणाला तरी फोन केला. मनवा यांनी त्याला गाडी थांबवायला सांगितलं. पण, त्याने गाडी थांबवली नाही. अखेर मनवा यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यांच्या ओरड्यामुळे सतर्क झालेल्या दोन बाईक चालक आणि एका रिक्षा चालकाने गाडीला घेराव टाकून ती थांबवली आणि मनवा यांची सुखरूप सुटका झाली. मी सध्या सुरक्षित असले तरी प्रचंड घाबरले आहे, असं मनवा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मनवा यांच्या अनुभवानंतर शहरात प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.