भाजपच्या कार्यकाळात शहरांचे मोठ्या प्रमाणात नामांतर; राजकारण असल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर चार वर्षांच्या काळात अनेक महत्त्वाच्या शहरांची आणि गावांची नावे बदलण्यात आली आहेत. या वर्षात गृहमंत्रालयाकडे नाव बदलण्यासाठी २७ प्रस्ताव आले आहेत. त्यात सर्वाधिक राजस्थान आणि हरयाणातील गावांचा समावेश आहे. चार वर्षात मोठ्या प्रमाणात झालेल्या नामांतरावरून विरोधकांनी सरकारवर टीका करत नामातरांमागे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. अहमदाबादचे नाव बदलून कामावती करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दिला आहे. तर अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी सादर केला आहे.

चार वर्षांत नामांतर झालेली शहरे, गावे

  • नोव्हेंबर २०१४- बंगलोरचे नाव बदलून बंगळुरू करण्यात आले. यासाह कर्नाटकातील १२ शहरांची नावे बदलण्यात आली. त्यात म्हैसूर आणि मेंगळुरू यांचा समावेश आहे. कन्नड उच्चारानुसार नावे बदलत असल्याचे कारण नामांतरासाठी देण्यात आले.
  • ऑगस्ट २०१५- औरंगजेब रोडचे नाव बदलून माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव त्याला देण्यात आले.
  • ऑक्टोबर २०१५- आंध्र प्रदेशातील राजाहमुंद्रीचे नाव बदलून राजामहेंद्रवर्मन असे करण्यात आले. ११ व्या शतकातील राज्यकर्ता राजा महेंद्रवर्मन यांच्या सन्मानार्थ शहराला त्यांचे नाव देण्यात आले.
  • एप्रिल २०१६- गुडगावचे नाव बदलून गुरुग्राम असे करण्यात आले. महाभारत काळातील गुरु द्रोणाचार्य यांच्या नावाहून हे नामकरण करण्यात आले. तसेच मेवातचे नाव नूंह असे बदलण्यात आले.
  • मे २०१६- बंगळुरू रेल्वे स्थानकाला १९ व्या शतकातील थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतीवीर संगोल्ली रायन्ना यांचे नाव देण्यात आले.
  • सप्टेंबर २०१६- पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या ७ रेसकोर्सचे नाव बदलून लोक कल्याण मार्ग असे करण्यात आले.
  • जानेवारी २०१७- हरयाणातील फतेहाबादमधील गांडाचे नाव बदलून अजितनगर करण्यात आले. नाव उच्च्यारण्यास संकोच वाटत असल्याने स्थानिकांच्या मागणीनुसार हे नामकरण करण्यात आले.
  • जुलै २०१७- ओदिशातील वीइलर या क्षेपणास्त्र परीक्षण केंद्राचे नाव मिसाइल मॅनच्या सन्मानार्थ डॉ.एपीजे अब्दुल कलाम करण्यात आले.
  • सप्टेंबर २०१७- गुजरातच्या पोर्टचे नाव बदलून दीनदयाल पोर्ट असे करण्यात आले.
  • फेब्रुवारी २०१८- राजस्थानच्या चोर बसईचे नाव बसई तर बिहारच्या नचनियाचे नाव काशीपूर करण्यात आले.
  • जुलै २०१८- मुंबईतील एलफिन्स्टन स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी असे करण्यात आले.
  • ऑगस्ट २०१८ – राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील मियों का बाडाचे नाव बदलून महेशनगर करण्यात आले. तसेच मुगलसराय स्थानकाचे नाव बदलून पंडित दीनदयाल उपाध्याय करण्यात आले आहे.
  • पश्चिम बंगालच्या विधानसभेत राज्याचे नाव बदलून बांग्ला करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. योग्य त्या प्रक्रियेनंतर आणि केंद्राच्या मंजुरीनंतरच राज्याचे नाव बदलण्यात येणार आहे.

रेल्वेकडेही नामांतराचे प्रस्ताव
रेल्वे खात्याने २०१७ मध्ये प्रख्यात साहित्यिकांची नावे एक्सप्रेस गाड्यांना देण्याची घोषणा केली होती. पश्चिम बंगालला जाणाऱ्या एखाद्या एक्सप्रेसला महाश्वेतादेवी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे. कोकणात जाणाऱ्या एक्सप्रेसला केशवसुत यांच्या कवितेवरून तुतारी एक्सप्रेस हे नाव मे २०१७ मध्ये देण्यात आले. दिल्लीहून आजमगढला जाणाऱ्या ट्रेनला उर्दू कवी केफी आजमी यांच्या नावावरून कैफीयत एक्सप्रेस असे नाव देण्यात आले. यासह अनेक एक्सप्रेसच्या नामांतरांचे प्रस्ताव रेल्वेकडे आले आहेत.