
सामना प्रतिनिधी, मुंबई
महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडमुळे वाहनांचा वेळ आणि इंधन वाचणार आहेच पण त्याचबरोबरीने पादचारी आणि मुंबईकरांसाठी असंख्य सोयीसुविधा मिळू शकणार आहेत. समुद्रात भराव टाकून जे भराव क्षेत्र निर्माण होणार आहे त्यावर उद्याने, जॉगिंग ट्रक, सायकल ट्रक, खुले नाट्यगृह, शौचालये, भूमिगत पार्किंग अशा विविध सोयीसुविधा मिळणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील कोस्टल रोड हा देशातील एकमेव असा गुंतागुंतीचा महाप्रकल्प आहे. कोणालाही विस्थापित न करता हा महाप्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. इतकेच नाही तर या प्रकल्पामुळे मुंबईकरांना असंख्य सुविधा मिळू शकणार आहेत. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सीलिंकपर्यंच्या अवघ्या 9.98 किमीच्या कोस्टल रोडच्या आजूबाजूला अनेक सुविधा मिळणार आहेत.
78 टक्के जागेवर सोयीसुविधा
समुद्रात भराव टाकून बांधल्या जाणाऱ्या कोस्टल रोडमुळे 90 हेक्टर एवढे भराव क्षेत्र मिळणार आहे. या भराव क्षेत्रापैकी 22 टक्के क्षेत्रात सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे तर उर्वरित सुमारे 78 टक्के क्षेत्रात म्हणजेच 75 लाख 34 हजार 730 चौरस फूट परिसराचा उपयोग हा लॅडस्केपिंगसह विविध नागरी सुविधांसाठी करण्यात येणार आहे, ज्यामध्ये प्रसाधनगृह, जॉगिंग ट्रक, सायकल ट्रक, फुलपाखरू उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बसथांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमिगत पदपथ इत्यादींचा समावेश असणार आहे. याव्यतिरिक्त 1 हजार 625 एवढी वाहनक्षमता असलेल्या तीन भूमिगत वाहनतळांचाही यात समावेश असेल अशी माहिती मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मोहन माचिवाल यांनी दिली आहे.
एकूण भराव क्षेत्र – 96 लाख 87 हजार 510 चौरस फूट
कोस्टल रोडचे बांधकाम – 21 लाख 52 हजार 780 चौरस फूट (22 टक्के)
नागरी सुविधा – 75 लाख 34 हजार 730 चौरस फूट (78 टक्के)
जॉगिंग ट्रक व सायकल ट्रक – सागरी किनारा रस्त्यालगत स्वतंत्र ‘जॉगिंग ट्रक’ व ‘सायकल ट्रक’ उभारण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. या दोन्ही ट्रकची लांबी प्रत्येकी 6.20 किमी एवढी प्रस्तावित करण्यात आली आहे.
सागरी पदपथ – नेताजी सुभाष मार्ग (मरीन ड्राइव्ह) व खान अब्दुल गफार खान मार्ग (वरळी सी फेस) या दोन्ही ठिकाणी पालिकेद्वारे बसण्यासाठी कट्टय़ांसह सागरी पदपथ आहेत. याच धर्तीवर कोस्टल रोडला लागूनच मुंबईतील सर्वात मोठा सागरी पदपथ विकसित करण्यात येणार आहे.
प्रसाधनगृह – पुरेशा प्रमाणात व ठरावीक अंतरानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अद्ययावत प्रसाधनगृहे बांधण्यात येणार आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सुविधा देखील या प्रसाधनगृहांमध्ये असणार आहेत.
खुले नाट्यगृह – प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यालगतदेखील महापालिकेद्वारे एक खुले नाटय़गृह उभारण्यात येणार आहे.
तीन भूमिगत वाहनतळ
प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यालगत असणाऱ्या धार्मिक स्थळांना व पर्यटनस्थळांना नागरिक मोठय़ा संख्येने भेट देत असतात. हे लक्षात घेऊन या स्थळांच्या जवळच्या परिसरात तीन मोठे भूमिगत वाहनतळ उभारण्यात येणार आहेत.
१. महालक्ष्मी मंदिर व हाजीअली दर्गा यांच्या जवळ
२. ‘अमर सन्स गार्डन’जवळ
३. वरळी डेअरी व वरळी सी फेस येथे तिसरे वाहनतळ उभारण्यात येणार आहे.
या तिन्ही वाहनतळांची एकूण वाहनक्षमता – 1 हजार 625
बसथांबे व भूमिगत पदपथ
कोस्टल रोडलगतच 14 ठिकाणी बसथांबे उभारण्यात येणार आहेत. बसथांब्यापर्यंत प्रवाशांना पोहचता यावे यासाठी ‘भूमिगत पदपथ’ देखील तयार करण्यात येणार आहेत.
summary- many facilities will available with coastal road

































































