
सामना प्रतिनिधी, मुंबई
राजकीय पक्ष स्थापन करण्यास मराठा समाजाची मान्यता नाही, मात्र काही स्वयंघोषित मराठा नेते समाजाला विश्वासात न घेता निर्णय घेतात. हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. दिशाभूल करणाऱ्या समन्वयकांना धडा शिकवणार, असा इशारा ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’च्या वतीने देण्यात आला.
‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’चे आबासाहेब पाटील यांनी आज पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, यापुढे कोणत्याही राजकीय नेत्याला मराठा मोर्चाच्या व्यासपीठावर कार्यरत व्हायचे असेल तर त्याला त्याच्या राजकीय पदाचा राजीनामा देऊनच या व्यासपीठावर यावे लागेल. कोल्हापुरात काही मराठा समाजाच्या लोकांनी ‘मराठा क्रांती पक्ष’ स्थापन केला. तसेच काही मंडळी येत्या काही दिवसांत मराठा समाजाचा अजून एक नवीन पक्ष स्थापन करणार आहेत, पण या पक्षांचा ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’शी काहीही संबंध नाही असे यावेळी सांगण्यात आले.
मराठा समन्वयकांना ओळखपत्रे देणार
आगामी काळात तुळजापुरात मराठा क्रांती ठोक मोर्चाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत मोर्चाची आचारसंहिता ठरवण्यात येईल. मोर्चाच्या समन्वयकांना येत्या काळात ओळखपत्रे देण्यात येतील तेच त्या त्या जिल्ह्यांमध्ये मोर्चाची भूमिका मांडतील, असेही आबासाहेब पाटील यांनी सांगितले.
रस्त्यावरील आंदोलने थांबवणार
ज्यांना पोलीस त्रास देतात त्या मराठा तरुणांनी मोर्चाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी केले. मराठा समाज संघटित झाला तर सर्वच राजकीय पक्षांना त्याचा फटका बसेल त्यामुळेच आमच्या आंदोलनात माणसे सोडून हस्तक्षेप केला जात आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चा यापुढे रस्त्यावरील आंदोलने थांबवणार असून आम्ही येत्या काही दिवसांत शिक्षण संस्थांविरोधात आंदोलन करणार आहोत. सरकारने निर्णय घेऊनही राज्यातील काही संस्था पन्नास टक्के फी माफ करत नाहीत यावर आम्ही आवाज उठवणार आहोत, असे आबासाहेब पाटील यांनी सांगितले.
summary- maratha kranti morcha leader warned over diverting issues























































