
सामना प्रतिनिधी । मुंबई
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होऊनही 586 तरुणांना अजूनही बढती देण्यात आलेली नाही. हा या तरुणांवर अन्याय असून येत्या दोन दिवसांत पदोन्नती दिली गेली नाही तर हजारो तरुण 18 डिसेंबरला थेट पोलीस महासंचालकांच्या कार्यालयावर धडक देतील असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे सरकारला दिला आहे.
हे प्रकरण न्यायालयात गेले, ‘मॅट’मध्येही गेले असून शासकीय अधिकाऱयांमध्ये संबंधित विभागाचे सचिवही हा विषय वारंवार टाळत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही अतिरिक्त जागा शिल्लक असल्यास या 586 तरुणांना बढती देण्याचे आदेश दिले होते, पण त्यांचे आदेशही पाळले गेलेले नाहीत. अधिकाऱयांची अशीच भूमिका राहिली तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्य परिवहन महामंडळातील 742 तरुण परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांना कामावर रुजू करून घेतलेले नाही. महसूल विभागातील अप्पर जिल्हाधिकाऱयांची पदोन्नती दोन-तीन वर्षांपासून रखडलेली आहे. 72 अधिकारी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असतानाही त्यांना बढती दिली जात नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांनी बढतीचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. एप्रिल 2014 च्या अंतिम सेवाज्येष्ठता यादीत उपजिल्हाधिकारी पदावर असणाऱया आणि बढतीसाठी पात्र असणाऱया 25 जणांना अजूनही बढती दिली गेलेली नाही, असे पाटील यांनी सांगितले.
जाणूनबुजून जातीचे राजकारण
या तरुणांना परीक्षेत 230 हून अधिक गुण मिळालेले आहेत. त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, पण गृह विभागातल्या काही अधिकाऱयांकडून जाणूनबुजून जातीचे राजकारण केले जात आहे. त्याचाच आधार घेत विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर पदोन्नती डावलली जात आहे. या विद्यार्थ्यांनी पदोन्नतीची परीक्षा उत्तीर्ण होऊन वर्ष उलटून गेले तरीही त्यांना डावलले जात असल्याचा आरोप आबासाहेब पाटील यांनी केला. 24-24 तास डय़ुटी करूनही 12-12 तास अभ्यास केला, पण कायदेशीर बाबी, नियम, अटी, न्यायालय अशी भाषा वापरून अधिकारी मनमानी करत असल्याचे पाटील म्हणाले.
























































