
सामना प्रतिनिधी । कोल्हापूर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौक येथे प्रतिकात्मक फाशी आंदोलन करण्यात आले. आरक्षणाचा निर्णय लवकर घेतला नाही तर हाच फासाचा दोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात घालू असा इशारा देण्यात आला. तसेच मराठा आरक्षणासाठी झाल्या तेवढ्या आत्महत्या बस्स झाल्या. यापुढे मरायचे नाही तर मारायचे अशा घोषणा देत, प्रतिकात्मक आत्महत्या करणाऱ्या आंदोलकांनी मरण्यापूर्वी आरक्षण मिळावे अशी अंतिम इच्छा व्यक्त करुन भावनिक साद घातली.
एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्या भोवती प्रदक्षिणाही घालण्यात आली. सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या सोमवारपासून ऐतिहासिक दसरा चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. विविध पक्ष, संघटना, संस्थांचा दिवसेंदिवस पाठिंबा वाढतच आहे. गाव बंद करून रॅली तसेच पायी चालत येऊन पाठिंबा देण्यासाठी गर्दी होत आहे.


























































