मेगा भरती स्थगितीच्या निर्णयाचे आंदोलकांकडून स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी ।परळी

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी १९ दिवसांपासून परळी येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनाचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. यानंतर आरक्षणाची प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करू अशी माहिती देत आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. या घोषणेचे परळीतील मराठा मोर्चा आंदोलनाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी स्वागत केले. मात्र,ही घोषणा लेखी स्वरुपात आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मेगा भरती रद्द करावी, मराठा आंदोलकांवर विविध ठिकाणी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, आंदोलनात सहभागी होत जीवाची आहुती देणाऱ्या आंदोलकांच्या कुटुंबियांना भरीव तरतूद द्यावी अशा मागण्या परळीतील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी केल्या आहेत. “मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत दिलेली माहिती आणि मेगा भरती स्थगित करण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. मात्र, गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सविस्तर खुलासा केला पाहिजे. परळीतील आंदोलनस्थळी मुख्यमंत्र्यांचे याबाबतचे लेखी निवेदन मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील” असेही समन्वयक आबासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.