नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुतळयाला बांगड्यांचा हार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

सकल मराठा समाजातर्फे गुरूवारी आयोजित नागपूर बंदला येथे चांगला प्रतिसाद मिळाला. महाल, इतवारी, गांधीबागसह बहुतांश भागात व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली. तर निदर्शनावेळी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला बांगड्यांचा हार घालण्यात आले. काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रकार झाले. पण तुरळक प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला. दरम्यान मानकापूर येथे काही आंदोलकांनी हाय स्पीड रेल्वेसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे त्यांचा जीव वाचला. आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. नागपूर येथील महाल गांधीगेट येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाआरती करून आंदोलनाला सुरूवात झाली. महाआरतीला शेकडो समाज बांधव उपस्थित होते. मुधोजी राजे भोसले यांनी आंदोलन शांततामय मार्गाने करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. महाआरती नंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत कार्यकर्ते गटागटाने बंदचे आवाहन करण्यासाठी रवाना झाले.

पोलिसांमुळे वाचला आंदोलकांचा जीव

साडेबारा ते पाऊण वाजताच्या सुमारास काही आंदोलकांनी मानकापूर उड्डाणपुलावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी रास्ता रोको करू न दिल्यामुळे अचानक आंदोलकांनी जवळच्या रेल्वे रूळाकडे धाव घेतली. त्याच वेळी येत असलेल्या हाय स्पीड रेल्वेगाडीसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मानकापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंगेश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवित आंदोलकांना रेल्वे रूळाच्या दोन्ही बाजूला खेचले. त्यामुळे दोन ते तीन आंदोलकांचे जीव वाचले. या प्रकरणी पोलिसांनी दहा आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

एस. टी. बस निघाल्याच नाही

यापूर्वी झालेल्या मराठा आंदोलनात एस. टी. बसेसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मराठा आंदोलकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला लक्ष्य केले. त्यामुळे नागपूर येथे एस. टी. महामंडळाने मुख्य बसस्थानकातून बसगाड्या सोडल्याच नाही. परिणामी प्रवाशांना परत जावे लागले. या शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील शैक्षणिक संस्थांनी शाळा-महाविद्यालयांना सुटी दिली. त्यामुळे एरवी गजबज आणि वर्दळीचे रस्ते शांत होते. महाल भागात महिला कार्यकर्त्यांनी फिरून दुकाने बंद केली. काही ठिकाणी दगडफेकीच्या तुरळक घटना घडल्या. परंतु वेळीच पोलीस पोहोचल्याने घटनांनी गंभीर वळण घेतले नाही. सायंकाळी शिवाजी पुतळ्याजवळ आंदोलनाचा समारोप झाला.

मुख्यमंत्र्यांच्या पुतळयाला बांगड्यांचा हार

दरम्यान, आंदोलक महिलांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार घालत विरोधात जोरदार नारेबाजी केली. मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढला नाही तर पुढचे आंदोलन आक्रमक होईल, असे मराठा आंदोलक महिलांनी यावेळी सांगितले. सुरक्षेच्या दृष्टीने नागपुरात ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बांगड्यांचा हार घालून मिरवणूक काढणाऱ्या आंदोलकांकडून पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा हिसकावून घेत तो पोलीस व्हॅनमध्ये ठेवला.

पालकमंत्र्यांना आंदोलकांचा घेराव

उर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा आंदोलकांच्या असंतोषाचा सामना करावा लागला. महाल भागातील नगरभवनात पालकमंत्र्यांनी पत्र परिषद बोलावली होती. काही मराठा आंदोलकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घातला. आंदोलक संतप्त झाल्याने उर्जामंत्री बावनकुळे पोलिसांच्या मदतीने तेथून कसेबसे बाहेर पडले.