16 टक्के आरक्षणाचा निर्णय योग्यच, याचिकाकर्त्यांची हायकोर्टात माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मराठा समाज मागास असल्याबाबत विविध आयोग आणि समित्यांनी आपले अहवाल दिले. गायकवाड समितीने राज्य मागास प्रवर्ग आयोगाच्या माध्यमातून दिलेला अहवाल सविस्तरपणे 48 मुद्दय़ांवर मांडलेला असून हा अहवाल परिपूर्ण आहे. त्यामुळे सरकारने त्या आधारावर मराठा समाजासाठी घेतलेला 16 टक्के आरक्षणाचा निर्णयही योग्यच आहे, असा दावा आज राज्य सरकारच्या निर्णयाला समर्थन करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात केला.

मराठा आरक्षण समर्थनार्थ विविध याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी ऍड. आरिफ बुकवाला यांनी याचिकाकर्ते ऍड. वैभव कदम यांच्या वतीने युक्तिवाद केला. कालेलकर, देशमुख, मंडल, राष्ट्रीय मागास प्रवर्ग आयोग, बापट आणि राणे समितीने मराठा समाजाबद्दल आपले मुद्दे अहवालातून सादर केले आहेत. या सर्वांनी मर्यादित मुद्दय़ावर या समाजाचा विचार केला, मात्र सर्व मुद्दय़ांचा एकत्रित आढावा आजवर कोणत्याही समितीने अथवा आयोगाने घेतलेला नाही. मंडल आयोगाने 3743 समाजघटकांबाबत मत मांडले होते. याउलट मागास प्रवर्ग आयोगाच्या गायकवाड समितीने 48 प्रमुख मुद्दे  (शिक्षण, रूढी-परंपरा, पैसा, जमिनी, सुविधा, शेती, कर्ज, महिला, विवाह, राजकारण इ.) निश्चित करून त्याबाबत जाणकार संस्थांकडून सर्वेक्षणात्मक तपशील मागवला. यावर चर्चा करून त्याला गुण देण्यात आले आणि त्यानंतरच आरक्षणाचा निर्णय घेतला गेला असे त्यांनी सांगितले.