
संसदेत घटना दुरुस्ती करून ‘ईडब्ल्यूएस’ला 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडता येते, तर मराठा आरक्षणासाठीही घटना दुरुस्ती का केली जाऊ शकत नाही? घटना दुरुस्तीचे असेच संरक्षण ‘एसईबीसी’ आरक्षणाला का मिळू शकत नाही? असा सवाल सार्वजनिक बांधकाममंत्री व राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज केला.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. पण केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून ‘ईडब्ल्यूएस’ला ही मर्यादा ओलांडता येईल, अशी तरतूद केली आहे. या परिस्थितीत संसदेने मराठा आरक्षणासाठीही अशीच तरतूद केल्यास हा प्रश्न सोडवणे सुकर होईल. त्यामुळे विशेष अधिवेशन घेऊन संसदेत ही घटना दुरुस्ती व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
केंद्राच्या फेरविचार याचिकेमध्ये ‘मराठा आरक्षण’ या शब्दाचा साधा उल्लेखही नाही. त्यांनी आपली भूमिका केवळ 102 व्या घटनादुरुस्तीपर्यंतच मर्यादित ठेवली आहे. हा ढकलाढकलीचा विषय नाही. एक तर तूर्तास राज्याला ‘एसईबीसी’ आरक्षण देण्याचे अधिकार राहिलेले नाहीत. हे अधिकार मिळाले तरी 50 टक्क्यांच्या मर्यादेमुळे त्याचा उपयोग होणार नाही. या अनुषंगाने खासदार संभाजीराजे छत्रपती प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधानांनी त्यांना भेटीसाठी वेळ दिली पाहिजे. त्यांना भेट न देणे योग्य नसल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.































































