सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू ठामपणे मांडणार! मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला पूर्वतयारीचा आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणाविरोधातील मूळ याचिका आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 7 जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीवेळी राज्य सरकार भक्कमपणे बाजू मांडणार असून यासाठी 1500 पानांची कागदपत्रे तयार ठेवण्यात आली आहेत. प्रख्यात विधिज्ञ मुकूल रोहतगी व अन्य ज्येष्ठ वकील सरकारची बाजू मांडणार असून हे आरक्षण टिकेल, असा विश्वास मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची मंगळकारी दुपारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. ही बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. बैठकीला समितीचे सदस्य मंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. मंत्री विजय वडेट्टीकार हे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले. हे आरक्षण टिकले पाहिजे, हीच सर्वांची भूमिका असून, त्याअनुषंगाने राज्य शासन अतिशय गांभिर्याने व सक्षमपणे काम करीत असल्याचे अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बालताना सांगितले.  खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून काही सूचना मांडल्या आहेत. त्या सूचनांवरही बैठकीत चर्चा झाली.