
सामना प्रतिनिधी । हिंगोली
जिल्ह्यात चौथ्या दिवशी देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडुन सुरू असलेल्या आंदोलनाचे संतप्त पडसाद उमटले आहेत. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापुर येथे रास्ता रोको दरम्यान राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार रामराव वडकुते यांना धक्काबुक्की करण्यात आली असून जलसंपदा विभागाच्या उर्ध्वपैनगंगा प्रकल्प क्रमांक ४ चे कार्यालयही पेटविण्यात आले. तसेच दाती पाटी येथे नांदेड-हिंगोली रस्त्यावर टायर जाळुन ट्रक पेटविण्यात आला. तर सेनगाव या तालुक्याच्या ठिकाणी बंद पाळण्यात आला असून गटशिक्षणाधिकारी कार्यालय पेटवून देण्यात आले.
दरम्यान, शुक्रवारी चौथ्या दिवशी देखील जिल्ह्यात राज्य परिवहन मंडळाच्या बस बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. कळमनुरी तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीचे तीव्र पडसाद उमटले. दोन दिवसापुर्वी डोंगरकडा येथे पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनाच आंदोलना दरम्यान धक्काबुक्की करण्यात आली होती. आखाडा बाळापुर येथे शुक्रवारी रोजी नांदेड-हिंगोली मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच दाती पाटी येथे देखील रास्ता रोको दरम्यान रस्त्यावर टायर जाळून आर.जे. ०६ – जी.ए. ७१८८ या क्रमांकाचा ट्रक पेटवून देण्यात आला. कळमनुरी व हिंगोलीच्या अग्निशमन बंबाने ट्रकची आग आटोक्यात आणली.
बाळापुरात रास्ता रोको दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते हे भाषणासाठी उभे राहताच घोषणाबाजी करुन धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे वडकुते यांना पळ काढावा लागला. बाळापुर येथील पाटबंधारे वसाहतीत असलेल्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयाला देखील आग लावण्यात आली आहे. सेनगाव येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली असुन गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला आग लावण्यात आली. या आगीत कार्यालयातील साहित्य व खुर्च्या जाळल्या आहेत.
Maratha reservation protest in hingoli. The agitator misbehaviour with ncp mla ramrao wadkute




























































