
सामना ऑनलाईन, बीड
मराठा समाजाला आरक्षण तातडीने लागू करावे आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारी मेगाभरतीला स्थागिती दयावी या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील वडवणी इथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाजातील बांधव सहभागी झाले होते. मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्यांनी तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
वडवणीत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सकाळपासूनच मराठा बांधव मोठ्या संख्येने जमायला लागले होते. सकाळी ११ वा बचतगट भवन येथे सगळे बांधव एकत्र आले आणि तिथून मोर्चाला मोठं स्वरूप प्राप्त झालं. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. सत्ताधारी आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन कर्त्यानी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या, मोर्चेकऱ्यांनी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून आपल्या भावना व्यक्त केल्या.




























































