न्यायालयीन प्रक्रियेला धक्का न लावता मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा अजित पवार यांचे आश्वासन

ajit-pawar

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रक्रियेला धक्का न बसता आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढून त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राज्य सरकारने शिक्षण आणि शासकीय नोकरीत मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. मात्र, आरक्षणाचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आरक्षण न्यायप्रविष्ट असताना मराठा समाजातील काही तरुण गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत.

या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी त्यांच्या दालनात आंदोलनकर्त्या तरुणांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यावेळी बोलताना पवार म्हणाले, मराठा बांधवांना आरक्षणाचा लाभ देण्यास तसेच आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविण्यास राज्य सरकार बांधील आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाचा मराठा आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेऊनच मराठा आंदोलकांच्या मागण्यांबाबत कार्यवाही झाली पाहिजे यावर बैठकीत एकमत झाले. बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, सचिव शिवाजी जोंधळे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या