मराठा आंदोलन आणखी पेटले, पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार आणि मेगा भरतीला स्थगिती देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतरही मराठा समाजाचे आंदोलन शमण्याची चिन्हे काही अजून तरी दिसत नाहीत. काल ‘बंद’च्या निमित्ताने ते आंदोलन अधिकच पेटले.

मराठा समाजाला सरकारी नोकऱया आणि शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे वगळून उर्वरित महाराष्ट्रात पुकारलेला बंद जवळजवळ १०० टक्के यशस्वी झाला. पुणे, सोलापूर, संभाजीनगर, नांदेड यांसह अनेक ठिकाणी या बंदला हिंसाचार, जाळपोळ, दगडफेकीचे गालबोट लागले. यामुळे हे आंदोलन आणखी पेटले आहे. मराठवाडय़ात संभाजीनगर येथील वाळूंज भागात २० मल्टिनॅशनल व इतर ४० कंपन्यांची तोडफोड झाली. या वेळी निदर्शकांनी पोलीस आयुक्तांच्या ताफ्यावरही दगडफेक केली. यात चार पोलीस जखमी झाले आहेत. पुण्यात आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचीही तोडफोड केली. नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सत्यप्रभा आणि पुढारीच्या कार्यालयावर दगडफेक केली. आंदोलकांनी पुणे-मुंबई एक्प्रेस हायवे सकाळी १०.३० पासून सायंकाळी ६.३०पर्यंत रोखला. यामुळे प्रवाशांचे, वाहनचालकांचे हाल झाले.

मुंबई सुरळीत
मुंबईत आंदोलन न करण्याचा निर्णय मराठा क्रांची मोर्चा समन्वय समितीने घेतला होता. त्यानुसार गुरुवारी मुंबईवर बंदचा परिणाम जाणवला नाही. केवळ वांद्रय़ातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. परंतु या आंदोलनाचा परिणाम वाहतुकीवर झाला नाही. सर्व व्यवहार सुरळीत पार पडले. ही घटना वगळता मुंबईत कुठेही आंदोलन झाले नाही. त्यामुळे घडाळय़ाच्या काटय़ावर धावणाऱया मुंबईचा वेग गुरुवारी कायम होता. सरकारी कार्यालये, रुग्णालये, रेल्वे वाहतूक, बस वाहतूक सुरळीत सुरू होती. परिणामी, मुंबईकरांना कुठल्याही त्रासाचा सामना करावा लागला नाही.

सातारा जिल्ह्यात जनजीवन ठप्प
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यव्यापी बंदला सातारा जिह्यात कडकडीत प्रतिसाद मिळाला. सातारा शहर तसेच तालुक्यांच्या ठिकाणच्या व्यापारी, विक्रेते, व्यावसायिकांनी बाजारपेठा बंद ठेवल्या. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. राज्य परिवहन विभागाची एकही एसटी बाहेर न पडल्यामुळे जिह्यातील जनजीवन ठप्प झाले.

एसटीच्या ९० टक्के फेऱया बंद
आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने गुरुवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मुळे एसटी महामंडळाच्या ९० टक्के फेऱया बंद ठेवाव्या लागल्याने एसटी महामंडळाला २० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. राज्यातील २५२ हून अधिक आगारांपैकी २१८ आगारांना बंद ठेवावे लागल्याने एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलन होत असताना शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी मुंबईतील विधान भवनासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. विधान भवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार घालण्याची त्यांची मागणी सुरक्षारक्षकांनी फेटाळली. त्यामुळे त्यांनी भवनासमोरच रस्त्यावर ठाण मांडून आंदोलन केले. शेवटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरू असून या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक स्वरूप प्राप्त झाले आहे. आंदोलकांकडून दगडफेक, जाळपोळ करण्यात येत असून यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे. त्यामुळे उपद्रव करणाऱया आंदोलकांवर कारवाई करावी, तसेच त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे.