
सामना प्रतिनिधी । नरसीफाटा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज श्रीक्षेत्र राहेर येथील गोदावरी नदीच्या काठावर तीव्र निदर्शने करण्यात आली. जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या शेकडो युवकांना पोलीस प्रशासनाने शेवटपर्यंत रोखून धरल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी झालेल्या प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
नायगांव, उमरी व धर्माबाद तालुक्यातील सकल मराठा क्रांती मोर्चा कडून शुक्रवारी श्रीक्षेत्र राहेर येथील गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. याची गंभीर दखल घेत प्रशासनाने राज्य राखीव दलाच्या तुकडीसह गोदावरी नदीपात्रा भोवती प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात केला होता. अतिरिक्त पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे व सहाय्यक पोलीस अधिक्षक नुरुल हसन हे स्वतः आंदोलन स्थळी हजर होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने अगोदरच बोटी सज्ज ठेवून जीवरक्षक युवकांना नदीपात्रात उतरवले होते. पोलिसांनी अनेक ठिकाणी चेकपाँईंट लावून नाकाबंदी केल्याने राहेरकडे येणारी वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र होते. अशाही परिस्थितीत असंख्य युवक हे पोलीस बंदोबस्त भेदून गगनचुंबी भगव्या ध्वजासह प्रचंड घोषणाबाजी करत जलसमाधी घेण्यासाठी गोदावरी नदीकडे धावले. सतर्क प्रशासनाने त्यांना नदीपात्राच्या अलीकडेच काही अंतरावर रोखून धरले. यावेळी संतप्त युवक व पोलीस अधिकारी यांच्यात शाब्दीक संघर्ष देखील उडाला.
यावेळी उपस्थित शेकडो आंदोलन कत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जबरदस्त नारेबाजी केली. ‘कोण म्हणत देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही’ यासह अनेक गगनभेदी घोषणा देवून युवकांनी परिसर दणाणून सोडला.

































































