
“मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला आहे. मला कितीही दोष दिले, शिव्या दिल्या तरी मी प्रत्येक समाजासाठी काम कालही करत होतो, आजही करत आहे आणि उद्याही करत राहिल”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसांनी आमरण उपोषण मागे घेतलं. यावरच प्रतिक्रिया देताना माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, “हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी झाल्यामुळे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना, त्यांच्या रक्तातील सर्वांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळणार.”
दरम्यान, आज सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आले होते. या शिष्टमंडळाने जरांगे यांनी केलेल्या हैदराबाद गॅझेटची मागणी सरकारने मान्य केली असल्याचं सांगितलं. मराठा उपसमितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचे जाहीर केले. याचा जीआरही उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांना दिला. जो जरांगे पाटलांनी स्वीकारला आणि आपलं उपोषण मागे घेतलं.